बारामतीतील प्रशासकीय कार्यालयात अधिकारी अनुपस्थित; नागरिक मात्र हेलपाटे मारून त्रस्त
नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत

बारामतीतील प्रशासकीय कार्यालयात अधिकारी अनुपस्थित; नागरिक मात्र हेलपाटे मारून त्रस्त
नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील तहसीलदार कार्यालयात सध्या अधिकारी त्यांच्या खुर्च्यांवर अनुपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध कामांसाठी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत बराच वेळ थांबावे लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या अगोदर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे कारण सांगून अनेक अधिकारी आपले काम टाळत होते.
अनेक महत्त्वाच्या कामांसाठी दररोज मोठ्या संख्येने नागरिक तहसील कार्यालयात येतात. मात्र, संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. काही ठिकाणी अधिकारी खुर्चीवर नसून, कर्मचारी मोबाईलवर व्यस्त असल्याचेही दिसून येत आहे.
यामुळे कार्यालयातील कामकाजाची गती मंदावली असून, सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असल्याची तक्रार केली जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना दिवसभर थांबूनही काम न झाल्याने परत जावे लागत असल्याची उदाहरणे समोर आली आहेत.
दरम्यान,दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी प्रशासनाने तत्पर आणि जबाबदारीने काम करावे,असे अनेकदा अधोरेखित केले होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कार्यालयातील उपस्थिती आणि कामकाजाची शिस्त सुधारावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच कार्यालयात नियमित तपासणी, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली आणि नागरिकांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.






