स्थानिक

तेलंगणा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर केलेल्या हल्ल्याचा बारामतीत निषेध केला व्यक्त

ही घटना लोकशाही मूल्यांना, सामाजिक ऐक्याला आणि संविधानिक तत्त्वांना बाधा आणणारी आहे.

तेलंगणा येथे महात्मा फुले यांच्या पुतळ्यावर केलेल्या हल्ल्याचा बारामतीत निषेध केला व्यक्त

ही घटना लोकशाही मूल्यांना, सामाजिक ऐक्याला आणि संविधानिक तत्त्वांना बाधा आणणारी आहे.

बारामती वार्तापत्र

७ फेब्रुवारी २०२६ रोजी तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक आहे. राष्ट्रपिता तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यावर दिवसाढवळ्या करण्यात आलेला हल्ला हा केवळ एका पुतळ्यावरील विध्वंस नसून, सामाजिक समता, शिक्षण आणि मानवतेच्या मूल्यांवर केलेला थेट आघात आहे.

या घटनेमुळे देशभरातील लाखो अनुयायी आणि समाजसुधारणेच्या विचारांवर श्रद्धा असलेल्या नागरिकांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या आहेत.

महात्मा ज्योतिराव फुले हे भारतीय सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. त्यांनी १८४८ साली पुण्यात देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे हे पाप मानले जात असताना त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला. त्यांनी क्रांतिकारी माता सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून घडवले आणि त्या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ठरल्या.

अशा महान समाजसुधारकाच्या पुतळ्याची विटंबना करणे म्हणजे समाजात तेढ, द्वेष आणि अशांतता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होय. अशा प्रकारचे कृत्य कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाऊ शकत नाही.

ही घटना लोकशाही मूल्यांना, सामाजिक ऐक्याला आणि संविधानिक तत्त्वांना बाधा आणणारी आहे. काही समाजविघातक प्रवृत्ती आजही सामाजिक न्याय, महिला शिक्षण आणि समानतेच्या विचारांना घाबरतात, याचे हे दुर्दैवी उदाहरण आहे.

या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासनाने तात्काळ तपास करून संबंधितांवर कडक शिक्षा करावी, तसेच समाजात शांतता आणि सलोखा टिकवण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, ही सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.

या निषेधार्थ आज बारामती येथील प्रशासकीय भवनात क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले जयंती उत्सव समिती, बारामती शहर व तालुका यांच्या वतीने प्रांताधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले. यावेळी घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.

Back to top button