स्थानिक

बारामती नगरपालिकेचा विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प जाहीर

आगामी वर्षात शहराच्या विकासाला गती देणारा ठरणार

बारामती नगरपालिकेचा विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प जाहीर

आगामी वर्षात शहराच्या विकासाला गती देणारा ठरणार

बारामती वार्तापत्र

बारामती नगरपरिषदेचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा मूळ अर्थसंकल्प तसेच सन २०२५–२६ चा सुधारित अर्थसंकल्प २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला. नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्ष श्वेता नाळे, गटनेते संजय संघवी, मुख्याधिकारी पंकज भुसे आणि सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.

सभेमध्ये आगामी वर्षासाठीचे आर्थिक नियोजन, विकासकामांची रूपरेषा आणि विविध कल्याणकारी योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

२०२६–२७ अर्थसंकल्पाची प्रमुख आकडेवारी

सन २०२६–२७ साठी एकूण अंदाजित जमा रक्कम रु. ५५१,८२,५५,०७० इतकी प्रस्तावित करण्यात आली आहे, तर एकूण खर्च रु. ५५१,७३,८०,००० इतका अपेक्षित आहे. अंदाजे रु. ८,७५,०७० इतकी शिल्लक दर्शविण्यात आली असून आर्थिक समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
जमा तपशील:
एकूण महसुली जमा : रु. १५१,२८,५०,०००
एकूण भांडवली जमा : रु. १८५,४२,२०,०००
एकूण जमा : रु. ३३६,७०,७०,०००
दि. ०१ एप्रिल २०२६ रोजीची अपेक्षित आरंभीची शिल्लक : रु. २१५,११,८५,०७०
शिल्लकेसह एकूण एकंदर जमा : रु. ५५१,८२,५५,०७०
खर्च तपशील:
एकूण महसुली खर्च : रु. १५४,९४,८०,०००
एकूण भांडवली खर्च : रु. ३९६,७९,००,०००
एकूण खर्च : रु. ५५१,७३,८०,०००
दि. ३१ मार्च २०२७ रोजीची अंदाजित अखेरची शिल्लक : रु. ८,७५,०७०

महसुली आणि भांडवली खर्चामध्ये संतुलन राखत पायाभूत सुविधा बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

विकासाभिमुख तरतुदींना प्राधान्य या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाचा आराखडा स्पष्ट करण्यात आला आहे. पुढील प्रमुख क्षेत्रांवर भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे:

शहरातील पायाभूत सुविधा विकास नागरी सुविधा सुधारणा पर्यावरण संवर्धन व हरित उपक्रम सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता व्यवस्थापन
सामाजिक सुविधा व नागरिक कल्याण योजना आर्थिक शिस्त, पारदर्शकता, सर्वसमावेशक विकास आणि दीर्घकालीन शाश्वत प्रगती ही या अर्थसंकल्पाची प्रमुख उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

नाविन्यपूर्ण व कल्याणकारी योजना नगरपरिषदेकडून विविध सामाजिक घटकांसाठी विशेष तरतुदी जाहीर करण्यात आल्या आहेत:

> स्पर्धा परीक्षा व भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी प्रोत्साहनपर उपक्रम – रु. ८० लाख
>सफाई कामगारांसाठी आरोग्य व अपघात विमा योजना – रु. १० लाख
>नगरपरिषद कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस आरोग्य विमा – रु. ४० लाख
>महिला सबलीकरणासाठी ५% तरतूद व PPP तत्त्वावर उपक्रम – रु. १ कोटी २५ लाख
>मागासवर्गीय सुधारणा (५% – रु. १.२५ कोटी) मधून महिलांसाठी हेल्थ कार्ड सुविधा
>दिव्यांग कल्याणासाठी ५% (रु. १.२५ कोटी) तरतूद; मासिक रु. १००० अर्थसाहाय्य
>गुणवंत खेळाडूंना आर्थिक प्रोत्साहन (क्रीडा विकासासाठी २.५% तरतूद)
>उद्यान विकासासाठी – रु. १० कोटी
>हरित उपक्रमांना मालमत्ता करामध्ये सवलत – रु. १ कोटी
>महिलांसाठी स्वतंत्र ‘पिंक’ शौचालयांसाठी – रु. ५ कोटी

अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर सभागृहात सखोल चर्चा झाली. सदस्यांनी सूचवलेल्या सूचना व दुरुस्त्या विचारात घेण्याचे आश्वासन देत अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.

या अर्थसंकल्पातून बारामती शहराच्या नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाचा स्पष्ट रोडमॅप समोर आला आहे. अल्प शिल्लक राखून आर्थिक जबाबदारीची जाणीव ठेवत तयार करण्यात आलेला हा अर्थसंकल्प आगामी वर्षात शहराच्या विकासाला गती देणारा ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

नगरसेवकांनी नागरिकांच्या विविध प्रश्नांवर किती जागरुक आहोत हे दाखवून देत आक्रमकपणे मुद्दे मांडत प्रशासनास धारेवर धरले.

या अर्थसंकल्पीय बैठकीमध्ये नगराध्यक्षांनी सर्वच नगरसेवकांना बोलू देण्याची भूमिका घेत या पुढील काळातही नगरसेवकांना विश्वासात घेत सभागृह चालविणार असल्याचा संदेश दिला. नगरसेवकांच्या सूचनांची दखल न घेणा-या कर्मचारी व विभागप्रमुखांबाबत कारवाईच्या सूचना नगराध्यक्षांनी मुख्याधिका-यांना केल्या.

घरपट्टी, भाडेकरुंवरील कर, पाणीपट्टीची चुकीची वसूली, जेथे भुयारी गटार नाही तेथे त्य कराची वसूली, वाहन दुरुस्ती, जेसीबीचा झालेला अतिरिक्त खर्च, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडीयमबाबतचा विषय, श्रीधर स्वामी सभागृहाचे भाडे रक्कम ताळेबंदात न दिसणे, झेरॉक्स मशीनचा दाखविलेला तब्बल 27 लाखांचा खर्च, खोदाई केलेल्या रस्त्यांची न केलेली दुरुस्ती यासह अनेक मुद्यांवर नगरसेवकांनी अभ्यासपूर्ण भूमिका मांडली.

नगराध्यक्ष सचिन सातव, उपनगराध्यक्षा श्र्वेता नाळे, गटनेते संजय संघवी व मुख्याधिकारी पंकज भुसे उपस्थित होते. नगरसेवक सुनील सस्ते, आरती गव्हाळे शेंडगे, नवनाथ बल्लाळ, जय पाटील, नीलेश इंगुले, विष्णूपंत चौधर, अभिजित जाधव, अभिजित चव्हाण, अमर धुमाळ, भारती शेळके, सोमनाथ गजाकस, राहुल वाघोलीकर, आलताफ सय्यद, राजेंद्र सोनवणे, प्रतिभा खरात, अनुप्रिता ताबे, दर्शना तांबे, संपदा चौधर, सविता जाधव, मनीषा बनकर, गणेश जोजारे, अमोल कावळे, गोरख पारसे, विशाल हिंगणे यांच्यासह इतरही नगरसेवकांनी अनेक मुद्यांवर प्रशासनास धारेवर धरले. नगराध्यक्ष सचिन सातव व गटनेते संजय संघवी यांनी अनेक मुदयांवर खुलासे करत नगरसेवकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला.

Back to top button