स्थानिक

नवीन ऑटोरिक्षा-टॅक्सी परवान्यांसाठी इरादापत्र देण्याचे काम स्थगित बारामती प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय; चालक-मालकांनी नोंद घ्यावी – सुरेंद्र निकम

राज्यभरातील विविध संघटनांकडून मिळालेल्या सूचना

नवीन ऑटोरिक्षा-टॅक्सी परवान्यांसाठी इरादापत्र देण्याचे काम स्थगित बारामती प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा निर्णय; चालक-मालकांनी नोंद घ्यावी – सुरेंद्र निकम

राज्यभरातील विविध संघटनांकडून मिळालेल्या सूचना,

बारामती वार्तापत्र 

राज्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुल्या धोरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, नवीन परवान्यांसाठी इरादापत्र देण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. परिवहन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ९ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बारामती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.

या निर्णयानुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामतीमार्फत नवीन ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यासाठी दिले जाणारे इरादापत्र (Letter of Intent) देण्याचे काम पुढील आदेश येईपर्यंत थांबविण्यात आले आहे. त्यामुळे नवीन परवान्यासाठी अर्ज केलेले अर्जदार तसेच भविष्यात अर्ज करण्याच्या तयारीत असलेल्या चालक-मालकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

परिवहन विभागाने घेतलेल्या या निर्णयामागे राज्यातील ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांच्या खुल्या धोरणाचा पुनर्विचार, तसेच वाहतूक व्यवस्थेचे नियोजन अधिक सक्षम करण्याचा उद्देश असल्याचे समजते. राज्यभरातील विविध संघटनांकडून मिळालेल्या सूचना, शहरांमधील वाहतुकीची वाढती गर्दी आणि विद्यमान वाहनांची संख्या लक्षात घेऊन या धोरणाचा आढावा घेतला जात आहे.

दरम्यान, बारामती उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्व ऑटोरिक्षा चालक, वाहन मालक, अर्जदार तसेच संबंधित संघटनांनी या निर्णयाची नोंद घ्यावी आणि पुढील सूचना येईपर्यंत नवीन परवान्यासाठी अर्ज प्रक्रियेबाबत कोणतीही अपेक्षा ठेवू नये, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

परिवहन विभागाकडून पुढील धोरण जाहीर झाल्यानंतरच नवीन ऑटोरिक्षा व टॅक्सी परवान्यांबाबतची प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्यातील तसेच बारामती परिसरातील वाहनचालक आणि अर्जदारांचे लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

Back to top button