कामगारपुत्र तनिष निगडे ने मिळवलेले यश प्रेरणादायी – धनंजय जामदार
बारामती औद्योगिक क्षेत्रात उद्योजक व कामगार बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बाब आहे.

कामगारपुत्र तनिष निगडे ने मिळवलेले यश प्रेरणादायी – धनंजय जामदार
बारामती औद्योगिक क्षेत्रात उद्योजक व कामगार बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बाब आहे.
बारामती वार्तापत्र
कौटुंबिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असताना देखील जिद्द व चिकाटीच्या जोरावर तनिष निगडे यांनी चार्टर्ड अकाउंटंटची अवघड परीक्षा वयाच्या केवळ २१ व्या वर्षी उत्तीर्ण झाला याचा विशेष आनंद वाटतो. त्याचे यश विद्यार्थ्यांना निश्चित प्रेरणादायी ठरेल असे गौरोद्गार धनंजय जामदार यांनी काढले .
बारामती एमआयडीसी मधील ग्राफिटेक कास्टिंग या लघुउद्योगांमध्ये गेली अनेक वर्षापासून कामगार म्हणून काम करणारे ज्ञानेश्वर निगडे यांचा मुलगा तनिष यांनी वयाच्या केवळ एकविसाव्या वर्षीच चार्टर्ड अकाउंटंटची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला, त्यानिमित्ताने बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या कार्यालयात तनिशचा सत्कार करण्यात आला त्यावेळी अध्यक्ष धनंजय जामदार बोलत होते.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष मनोहर गावडे, सचिव अनंत अवचट, खजिनदार अंबीरशाह शेख वकील, कार्यकारणी सदस्य खंडोजी गायकवाड, हरीश कुंभारकर, राजन नायर, ग्राफिटेक कास्टिंगचे संचालक चंद्रकांत नलवडे, ग्राफिटेक मधील कामगार ज्ञानेश निगडे व त्यांचा मुलगा तनिश निगडे याप्रसंगी उपस्थित होते.
धनंजय जामदार म्हणाले बारामती औद्योगिक क्षेत्रात उद्योजक व कामगार बांधवांसाठी ही अत्यंत आनंदाची व महत्त्वाची बाब आहे.
प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असताना देखील मुलांना उच्च शिक्षण देण्याचा ध्यास ज्ञानेश निगडे यांनी घेतला व चार्टर्ड अकाउंटंट ची अवघड परीक्षा उत्तीर्ण करून दाखवत तनिशने आई-वडिलांचा विश्वास सार्थ ठरवला. ग्राफिटेक कास्टिंगचे संचालक चंद्रकांत नलावडे व नितीन नलवडे यांनी ज्ञानेश निगडे यांना सर्वतोपरी मदत करून तनिशच्या यशाला हातभार लावला याचे समाधान वाटते असे धनंजय जामदार म्हणाले.
बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तनिश निगडे व ज्ञानेश्वर निगडे या पितापुत्रांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






