बारामतीत खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष बदलले पण नामांकित संस्थेवर त्याच अध्यक्षांना संधी;संचालकांमध्ये नाराजीची चर्चा
नेतृत्व बदलाचे संकेत

बारामतीत खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष बदलले पण नामांकित संस्थेवर त्याच अध्यक्षांना संधी;संचालकांमध्ये नाराजीची चर्चा
नेतृत्व बदलाचे संकेत
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील सहकारी संस्थांच्या राजकारणात सध्या वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. एका बाजूला बारामती तालुका खरेदी-विक्री संघात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांवर बदल करण्यात आला असताना, दुसऱ्या बाजूला नामांकित संस्थेत मात्र पुन्हा त्याच अध्यक्षांची फेरनिवड झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.
बारामती तालुका खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर नुकतीच नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. या निवडीत नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, संघात नेतृत्व बदलाचे संकेत दिसून आले. या निर्णयाचे स्वागत झाले.
मात्र,याच पार्श्वभूमीवर बारामतीतील नामांकित संस्थेच्या निवड प्रक्रियेत वेगळीच भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.पुन्हा एकदा त्याच अध्यक्षांची निवड करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामुळे “एकाच ठिकाणी बदल आणि दुसऱ्या ठिकाणी बदल का नाही?”असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
स्व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थांमध्ये पदांची मुदत संपल्यानंतर विविध गावांना आणि कार्यकर्त्यांना संधी देण्याची पद्धत रूढ झाली होती.त्यामुळे नवीन नेतृत्वाला वाव मिळत होता.मात्र,यावेळी त्या परंपरेपासून काही प्रमाणात दूर गेल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे,संस्थेतील काही संचालक मंडळातील सदस्य या निर्णयामुळे नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. “आम्हालाही संधी कधी मिळणार?” असा सवाल ते खाजगीत उपस्थित करत असल्याची चर्चा आहे.त्यामुळे संघाच्या अंतर्गत वातावरणात अस्वस्थता वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
या घडामोडींमुळे बारामतीतील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असून,पुढील काळात याचे काय परिणाम होणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






