बारामतीत 34 लाखांहून अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला

बारामतीत 34 लाखांहून अधिक रकमेच्या आर्थिक फसवणुकी प्रकरणी बारामती शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला
बारामती वार्तापत्र
बारामती शहर पोलीस स्टेशन येथे नोंद गुन्हा क्र. 314/2025 भा.न्या.संहिता 316(4), 318(4) अन्वये दाखल असलेल्या गंभीर आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी दत्तात्रय पोपटराव खुळे, रा. माळेगाव ता. बारामती जि. पुणे यास तब्बल ६ महिन्यांपासून फरार असताना अखेर बारामती शहर पोलीसांनी गोपनीय माहितीच्या आधारे अत्यंत कौशल्यपूर्ण व नियोजनबद्ध कारवाई करून जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.
सदर गुन्ह्यामध्ये आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून हॉटेल व्यवसायातील व्यवस्थापक म्हणून काम करताना ग्राहकांची बनावट नावे नोंदवून, उधारी दाखवून व आर्थिक व्यवहारात फेरफार करून तब्बल 34,33,393/- (चौतीस लाख तेहतीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपये) इतक्या रकमेचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीने जाणीवपूर्वक फरार राहून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला होता.
तथापि, बारामती शहर पोलीसांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा, तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांच्या जाळ्याचा प्रभावी वापर करून आरोपीचा ठावठिकाणा शोधून काढला व त्यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेऊन कायदेशीर अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे “गुन्हेगार कितीही चतुर असला तरी कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही” हा ठोस संदेश समाजात पोहोचला आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे, अपर पोलीस अधीक्षक श्री गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. श्री सुदर्शन राठोड, तसेच प्रभारी पोलीस निरीक्षक श्री चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक राऊत व तपास पथकातील सहा. पोलीस उपनिरीक्षक श्री संदीप जाधव, पोलीस हवालदार श्री रामचंद्र शिंदे, पोलीस शिपाई श्री अक्षय सिताफ यांनी अत्यंत धडाडीने व समन्वयाने कामगिरी पार पाडून आरोपीस अटक करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या कारवाईमुळे नागरिकांच्या मनात पोलिसांविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून, “कानून के हाथ लंबे होते हैं”, तसेच “पोलिसांच्या तावडीतून आरोपी उशिरा का होईना, पण सुटत नाही” या उक्तींना साजेशी प्रभावी कामगिरी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात आली आहे.
सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपहार झालेली रक्कम व इतर पुरावे जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बारामती शहर पोलीसांकडून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा फसवणुकीची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा.






