दूध संघाच्या प्रमुखाने पदाचा गैरवापर करून घेतला कोट्यावधी रुपयांचा अँडव्हान्स, बारामतीत चर्चांना उधाण
१० ते १२ लाख रुपये घेण्याची मर्यादा असते.

दूध संघाच्या प्रमुखाने पदाचा गैरवापर करून घेतला कोट्यावधी रुपयांचा अँडव्हान्स, बारामतीत चर्चांना उधाण
१० ते १२ लाख रुपये घेण्याची मर्यादा असते.
बारामती वार्तापत्र
बारामती परिसरातील सहकारी दूध संघात आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. संघाच्या प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीने पदाचा गैरवापर करून कोट्यवधी रुपयांचा ऍडव्हान्स घेतल्याचा गंभीर आरोप पुढे आला असून यामुळे संस्थेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दूध संघामध्ये साधारणपणे वार्षिक ऍडव्हान्स म्हणून गोळीपेंड व दूध खरेदीसाठी १० ते १२ लाख रुपये घेण्याची मर्यादा असते. मात्र संबंधित प्रमुखाने या मर्यादेचा भंग करत तब्बल सुमारे १ कोटी रुपयांचा ऍडव्हान्स घेतल्याचे उघड झाले आहे. हा प्रकार केवळ आर्थिक अनियमितता नसून पदाचा स्पष्ट गैरवापर असल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे.
विशेष म्हणजे, पुन्हा एकदा संघाच्या प्रमुखपदी निवड व्हावी यासाठी संबंधितांनी बारामतीतील एका मोठ्या राजकीय नेत्याचा आधार घेतल्याचीही चर्चा आहे. या राजकीय पाठबळाच्या जोरावरच त्यांनी संस्थेवर आपली पकड मजबूत ठेवली आणि आर्थिक व्यवहारांमध्ये मनमानी केल्याचा आरोप केला जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित रक्कम ३१ मार्च रोजी परत भरण्यात आली आहे. मात्र रक्कम परत भरली असली तरी सुरुवातीला एवढ्या मोठ्या प्रमाणात ऍडव्हान्स घेणे, तसेच त्यासाठी पदाचा वापर करणे, हा गंभीर मुद्दा मानला जात आहे. त्यामुळे केवळ रक्कम भरल्याने प्रकरण संपणार का, की यावर सखोल चौकशी होऊन कारवाई होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या पार्श्वभूमीवर “पुन्हा त्याच व्यक्तीला प्रमुखपद का?”असा सवालही सभासद आणि स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे. सहकारी संस्थांमधील पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवरून कठोर निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, संबंधित प्रकरणाची अधिकृत चौकशी होणार का,आणि दोषी आढळल्यास कोणती कारवाई होईल,याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र या संपूर्ण प्रकारामुळे बारामतीतील सहकार क्षेत्रात मोठी चर्चा रंगली असून पुढील काही दिवसांत या प्रकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.






