स्थानिक

बारामतीचा ‘AI’ ऊस शेती पॅटर्न, शरद पवार थेट बांधावर!

100 टनी ऊस उत्पादनाचा यशस्वी पॅटर्न

बारामतीचा ‘AI’ ऊस शेती पॅटर्न, शरद पवार थेट बांधावर!

100 टनी ऊस उत्पादनाचा यशस्वी पॅटर्न

बारामती वार्तापत्र 

माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामती येथे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) बेस्ड अत्याधुनिक ऊस शेतीची प्रत्यक्ष पाहणी केली. पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी बारामतीत सुरू असलेल्या या प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले.

या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बारामतीमधील शेतकऱ्यांनी ऊसाचे प्रति एकरी तब्बल 100 टन विक्रमी उत्पन्न मिळवून दाखवले आहे.

शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या AI तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक ऊस शेतीची पाहणीदरम्यान समोर आलेल्या महत्त्वाच्या AI बेस्ड शेतीला पूरक ठरलेल्या गोष्टी जाणून घेऊया.

पानातून अन्नद्रव्यांचे अचूक शोषण

या तंत्रज्ञानामध्ये ड्रोन आणि सेन्सर्सच्या माध्यमातून ऊसावर अत्यंत सूक्ष्म पद्धतीने फवारणी केली जाते. याद्वारे फवारणी करताना ऊसाच्या पानातून अन्नद्रव्ये थेट आणि प्रभावीपणे आत शोषली जातात. यामुळे पिकाला आवश्यक असणारी पोषणद्रव्ये योग्य प्रमाणात मिळतात आणि पिकाची सुदृढ वाढ होते.
पाणी आणि खत व्यवस्थापनाची ‘योग्य वेळ’

AI तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जमिनीतील आर्द्रता आणि पोषक घटकांचे अचूक मोजमाप करता येते.
अचूक वेळ (Delta T): पिकाला पाणी देण्याची किंवा फवारणीची नेमकी आणि योग्य वेळ (Delta T) हे तंत्रज्ञान अचूकपणे सांगते.
खत व्यवस्थापन: जमिनीमध्ये नेमके कधी आणि कोणत्या वेळी खत सोडायचे, याची माहिती सिस्टीमद्वारे मिळते. यामुळे पिकाची अन्न ग्रहण करण्याची क्षमता वाढते.
खतांची मोठी बचत आणि खर्चात कपात

पारंपरिक शेतीत अंदाजे खते दिल्याने मोठ्या प्रमाणावर खतांचा अपव्यय होतो. मात्र, या एआय तंत्रज्ञानामुळे ऊसाला नेमकी जेवढी गरज आहे, तेवढेच खत दिले जाते. परिणामी, खतांची प्रचंड बचत होते आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च लक्षणीयरीत्या कमी होतो.
रोपांची एकसारखी वाढ आणि 100 टनांचे उद्दिष्ट

या आधुनिक पद्धतीमध्ये एका एकरात साधारणपणे 4,500 रोपांची लागवड केली जाते. एआय मॉनिटरिंगमुळे या 4,500 रोपांना समप्रमाणात अन्नद्रव्ये आणि पाणी मिळते. परिणामी, संपूर्ण क्षेत्रातील रोपांची वाढ अत्यंत एकसारखी (Uniform Growth) झालेली पाहायला मिळते. पिकाच्या या एकसारख्या आणि दर्जेदार वाढीमुळेच शेतकऱ्यांना एकरी 100 टन ऊस उत्पादनाचा टप्पा गाठणे सहज शक्य झाले आहे.
ऊस उत्पादनाचा यशस्वी पॅटर्न

बारामतीचा हा 100 टनी ऊस उत्पादनाचा यशस्वी पॅटर्न राज्यातील इतर शेतकऱ्यांसाठीही मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Back to top button