माळेगाव बु

माळेगाव कारखान्याने उसाला प्रतिटन ३०० रुपये कांडे बिल द्यावे; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी तसेच शालेय साहित्यासाठी कांडे बिलाच्या पैशांचा उपयोग होतो.

माळेगाव कारखान्याने उसाला प्रतिटन ३०० रुपये कांडे बिल द्यावे; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी तसेच शालेय साहित्यासाठी कांडे बिलाच्या पैशांचा उपयोग होतो.

बारामती वार्तापत्र

माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गाळप हंगामात गाळप झालेल्या उसापोटी शेतकऱ्यांना प्रतिटन ३०० रुपये ‘कांडे बिल’ तातडीने अदा करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मागणीचे निवेदन कारखान्याचे कार्यकारी संचालक अशोक पाटील यांना देण्यात आले. यावेळी बारामती तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विलास सस्ते, उदयसिंग फडतरे, सुखदेव जाधव, सुरेश यादव, डॉ. राजेंद्र सस्ते आदी उपस्थित होते.

माळेगाव कारखाना दरवर्षी कारखाना बंद झाल्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कांडे बिल देत असतो. यामुळे अडसाली उसाच्या लागणीसाठी शेतीची मशागत करणे, जून महिन्यात शाळा व महाविद्यालय सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक फी तसेच शालेय साहित्यासाठी कांडे बिलाच्या पैशांचा उपयोग होतो. त्यामुळे हे कांडे बिल तातडीने ऊस उत्पादक शेतकरी सभासदांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

माळेगाव कारखान्याने चालू २०२५-२६ च्या हंगामात उत्कृष्ट दर्जाचे गाळप केले असून, साखर उताराही समाधानकारक आहे. कारखान्याचे व्यवस्थापन सक्षम असल्याने शेतकऱ्यांना हे कांडे बिल देणे प्रशासनाला सहज शक्य आहे, असा दावा संघटनेच्या वतीने केला आहे. आता यावर माळेगाव कारखान्याचे प्रशासन आणि संचालक मंडळ काय निर्णय घेणार, याकडे कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

Back to top button