राजकीय

आरोप बिनबुडाचे; समोरासमोर येऊन सिद्ध करावेत – बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ!

माझ्याबरोबर कोणतीही चर्चा नाही असेल तर व्हिडिओ दाखवा.

आरोप बिनबुडाचे; समोरासमोर येऊन सिद्ध करावेत – बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ!

माझ्याबरोबर कोणतीही चर्चा नाही असेल तर व्हिडिओ दाखवा.

बारामती वार्तापत्र 

कथित ऑडिओ क्लिप, विनयभंगाचा गुन्हा आणि राजीनाम्याच्या मागणीमुळे चर्चेत आलेले बारामतीतील नगरसेवक किशोर मासाळ यांनी अखेर संपूर्ण प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

आपल्यावरील आरोपांचा आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांचा नगरसेवक पदाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना मासाळ म्हणाले की, माझ्याविरोधातील पोलिस प्रकरणात काही लोकांकडून मला आणि पक्षातील काही व्यक्तींना जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

माझ्यावर करण्यात आलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून त्यामागे राजकीय हेतू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राजीनाम्याच्या मागणीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेते सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी अद्याप माझ्याकडे राजीनाम्याची मागणी केलेली नाही.

मात्र, काही जणांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्याची मागणी केली आहे. अशा व्यक्तींनी केवळ आरोप करण्याऐवजी ते माझ्यासमोर येऊन सिद्ध करावेत, असे खुले आव्हान त्यांनी दिले.

मी लोकांमधून निवडून आलेला नगरसेवक आहे. माझ्यावरील आरोपांबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सत्य समोर येईल. कोणाच्याही दबावाखाली येऊन राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही मासाळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या प्रकरणामुळे बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून विरोधकांकडून राजीनाम्याची मागणी सुरू असताना मासाळ यांनी मात्र आरोप फेटाळून लावत आपली भूमिका ठामपणे मांडली आहे.

Back to top button