राजकीय

‘माझा भगतसिंग करू नका!’; राजकीय कटाचा बळी ठरत असल्याचा किशोर मासाळ यांचा आरोप

रोहित पवारांच्या टीमवर पडद्याआडून काम केल्याचा दावा; दादांच्या स्मृतीस्थळी येऊन भूमिका स्पष्ट करण्याचे खुले आव्हान

‘माझा भगतसिंग करू नका!’; राजकीय कटाचा बळी ठरत असल्याचा किशोर मासाळ यांचा आरोप

रोहित पवारांच्या टीमवर पडद्याआडून काम केल्याचा दावा; दादांच्या स्मृतीस्थळी येऊन भूमिका स्पष्ट करण्याचे खुले आव्हान

बारामती वार्तापत्र

कथित ऑडिओ क्लिप, विनयभंगाचा गुन्हा आणि राजीनाम्याच्या मागणीमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय पदाधिकारी किशोर मासाळ यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली.

यावेळी त्यांनी कुटुंबीय, दादाप्रेमी आणि पक्ष कार्यकर्त्यांची जाहीर माफी मागत आपल्याविरोधात राजकीय कट रचला जात असल्याचा गंभीर आरोप केला.
“मी कुटुंबीय व समस्त दादाप्रेमींची जाहीर माफी मागतो.

दादांच्या अपघातस्थळी आत्मक्लेश करणार आहे. पक्ष नेतृत्वाकडे माझ्या पदाचा राजीनामा देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजितदादा पवार कुटुंबीयांशी एकनिष्ठ राहणार आहे.

२०२९ मध्ये वाहिनीसाहेबांवर विजयाचा गुलाल पडत नाही तोपर्यंत माझी निष्ठा कायम राहील,” असे मासाळ यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी थेट आमदार रोहित पवार यांचे नाव घेत गंभीर आरोप केले. “माझे राजकीय अस्तित्व संपविण्यासाठी कटकारस्थान सुरू आहे.

२०२९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पडद्याआडून काम सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्याविरोधात वातावरण तयार केले जात आहे. माझा राजीनामा घेतल्यास धनगर समाज दुखावेल आणि त्याचा राजकीय फायदा घेण्याचा डाव आखला जात आहे,” असा दावा त्यांनी केला.

“रोहित पवार यांनी दादांच्या स्मृतीस्थळी येऊन मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे समक्ष सांगावे. माझी भूमिका जातीय नाही. मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जातीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असे आव्हानही त्यांनी दिले.

राजीनाम्याच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना मासाळ म्हणाले, “नगरसेवक पदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही. मी राज्यस्तरीय पदाधिकारी आहे. काही जणांना माझ्याकडे नेमके कोणते पद आहे, हेही माहिती नाही.”

पत्रकार परिषदेत त्यांनी सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला. “मी नगरसेवक झाल्यानंतर माझा मृत्यू होऊ शकतो, असे एका छोट्या नेत्याने पूर्वी म्हटले होते. त्यामुळे मी बारामती शहर पोलिसांकडे सुरक्षेची मागणी करणारे पत्र दिले होते. बारामतीत काळी जादू आणि जादूटोण्याचे प्रकार होत असल्याच्या चर्चाही आहेत. दादांना गमावले, आता मला सुरक्षा द्यावी,” अशी मागणी त्यांनी केली.

सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याची खंत व्यक्त करताना त्यांनी, “पक्षाचा राजीनामा देण्याचा विचार आहे; मात्र नेतृत्वापर्यंत पोहोचू दिले जात नाही,” असे सांगितले. दरम्यान, गुन्ह्याबाबत आपल्याला माहिती नसल्याचा दावा करत मासाळ यांनी पुन्हा एकदा माफी मागितली. मात्र त्याचवेळी आपल्याविरोधात राजकीय कट रचला जात असल्याचा आरोप करून त्यांनी बारामतीच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फोडले आहे.

माझा भगतसिंग नको”
“माझे राजकारण संपले किंवा नाही संपले तरी काही जणांचा राजकीय फायदा होणार आहे. मात्र त्यासाठी माझा ‘भगतसिंग’ करू नका,” असे भावनिक आवाहन किशोर मासाळ यांनी पत्रकार परिषदेत केले.

Back to top button