स्थानिक

उजनी धरणाच्या पाणीपुरवठा योजनेवरून बारामती नगरपरिषद सभागृहात खळबळ, खाजगी कारखान्याला पाणी दिल्याचा नगरसेवकांचा आरोप

योजनेचा अपेक्षित लाभ शहरातील नागरिकांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

उजनी धरणाच्या पाणीपुरवठा योजनेवरून बारामती नगरपरिषद सभागृहात खळबळ, खाजगी कारखान्याला पाणी दिल्याचा नगरसेवकांचा आरोप

योजनेचा अपेक्षित लाभ शहरातील नागरिकांना मिळत नसल्याचे दिसून येत आहे.

बारामती वार्तापत्र 

बारामती शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या उजनी धरण पाणीपुरवठा योजनेवरून बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात सोमवारी चांगलाच गदारोळ झाला. शहरातील नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नसताना योजनेतील पाणी खाजगी कारखान्याला पुरवले जात असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक सुनिल सस्ते यांनी करत प्रशासनाला धारेवर धरले.

सस्ते यांनी सभागृहात कागदपत्रे आणि बिलांचा संदर्भ देत शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या पाण्याचा वापर नेमका कुठे होत आहे, याचा खुलासा करण्याची मागणी केली. बारामतीच्या वाढत्या लोकसंख्येचा आणि भविष्यातील गरजांचा विचार करून शासनाने शेकडो कोटी रुपयांची उजनी पाणीपुरवठा योजना उभारली. मात्र या योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अपेक्षित प्रमाणात पोहोचत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

“शहरात अनेक भागांत पाणीटंचाईची समस्या कायम असताना योजनेतील पाणी औद्योगिक वापरासाठी वळवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. यामागील सत्य नागरिकांसमोर आले पाहिजे,” असे सस्ते यांनी ठामपणे सांगितले.

या आरोपांनंतर सभागृहातील वातावरण तापले. अनेक नगरसेवकांनी हा विषय केवळ राजकीय नसून शहराच्या अस्तित्वाशी संबंधित असल्याचे सांगत सखोल चौकशीची मागणी केली. योजनेअंतर्गत मंजूर पाण्याचे प्रमाण, प्रत्यक्ष शहराला मिळणारा पुरवठा, औद्योगिक वापरासाठी वितरित होणारे पाणी आणि संबंधित आर्थिक व्यवहार यांचा संपूर्ण तपशील सभागृहासमोर ठेवावा, अशी मागणी सदस्यांनी केली.

काही नगरसेवकांनी नागरिकांच्या पैशातून उभारलेल्या योजनेत कोणतीही अनियमितता आढळल्यास जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी भूमिका घेतली. शहरवासीयांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा करणे हा योजनेचा मूळ उद्देश असून तोच धोक्यात येत असल्याची भावना सदस्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाने या सर्व आरोपांवर सविस्तर अहवाल सादर करावा, अशी मागणी सभागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी बैठकीत हा विषय आणखी तापण्याची शक्यता असून, उजनी योजनेतील पाण्याचा प्रवास नेमका कुठे होतो याचा उलगडा होणार का, याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले आहे.

“शहर तहानलेले, पाणी कुणाच्या घशात?” या प्रश्नाने आता बारामतीच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Back to top button