स्थानिक

बारामतीच्या पाणीटंचाईमागे प्रशासनाचा हलगर्जीपणा? साठवण तलावांतून लाखो लिटर पाणी गळती; नागरिक संतप्त

मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्याचे दिसून आले.

बारामतीच्या पाणीटंचाईमागे प्रशासनाचा हलगर्जीपणा? साठवण तलावांतून लाखो लिटर पाणी गळती; नागरिक संतप्त

मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्याचे दिसून आले.

बारामती वार्तापत्र

एकीकडे बारामती शहरातील नागरिकांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा सहन करावा लागत असताना, दुसरीकडे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी उभारण्यात आलेल्या साठवण तलावांतून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी नागरिकांना झगडावे लागत असताना हजारो नव्हे तर लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात असल्याने प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

नगरसेवक तथा बांधकाम सभापती अमर धुमाळ आणि पाणीपुरवठा सभापती समीर चव्हाण यांनी प्रत्यक्ष पाहणी करत हा प्रकार उघडकीस आणला. त्यांच्या पाहणीत जलशुद्धीकरण केंद्राशेजारील १२८ एमएलटी क्षमतेच्या साठवण तलावातून तसेच जळोची येथील २२२ एमएलटी क्षमतेच्या तलावातून मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होत असल्याचे दिसून आले. या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी ओढ्याकडे वाहून जात असल्याचेही निदर्शनास आले.

बारामतीकरांच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून विविध साठवण तलाव उभारण्यात आले. या प्रकल्पांमुळे भविष्यातील पाणीटंचाई टळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, आज त्याच तलावांची दुरवस्था आणि गळती पाहता प्रशासनाच्या देखरेखीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

विशेष म्हणजे, संबंधित पाणीपुरवठा प्रकल्पाचे काम २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र तीन वर्षांनंतरही अनेक कामे अपूर्ण असल्याचे समोर येत आहे. या विलंबाबाबत आणि गळतीच्या समस्येबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.

याचबरोबर विविध विभागांतील समन्वयाच्या अभावाचेही चित्र समोर आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नव्याने रस्त्यांचे डांबरीकरण केल्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून त्याच रस्त्यांचे खोदकाम करून पाणीवाहिन्या टाकल्या जात असल्याने सरकारी निधीचा अपव्यय होत असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात प्रभावी समन्वय नसल्याचे यावरून स्पष्ट होत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

सध्या नीरा डाव्या कालव्याचे आवर्तन बंद असल्याने बारामती शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेक महिने शहराला पाणीपुरवठा करण्याची क्षमता असलेल्या साठवण तलावांमधून मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचे समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

“नागरिकांना पाणी बचतीचे धडे देणारे प्रशासन स्वतःच्या यंत्रणेतून होणारी पाण्याची उधळपट्टी थांबवणार कधी?” असा सवाल आता बारामतीकर विचारत आहेत. गळतीची तातडीने दुरुस्ती करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

Back to top button