बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मान्यता; बारामती, दौंड, इंदापूरच्या नागरिकांना मोठा दिलासा
जमीनविषयक दाव्यांचा जलद निपटारा, प्रशासकीय कामांना मिळणार गती; हरकती-सूचना मागवल्यानंतर अंतिम अधिसूचना

बारामतीत अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला मान्यता; बारामती, दौंड, इंदापूरच्या नागरिकांना मोठा दिलासा
जमीनविषयक दाव्यांचा जलद निपटारा, प्रशासकीय कामांना मिळणार गती; हरकती-सूचना मागवल्यानंतर अंतिम अधिसूचना
बारामती वार्तापत्र
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांची प्रशासकीय कामे अधिक वेगाने मार्गी लागावीत आणि जमीनविषयक प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा, या उद्देशाने राज्य शासनाने बारामती येथे नव्याने अपर जिल्हाधिकारी कार्यालय स्थापन करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील नागरिकांना महसुली सेवांसाठी पुण्यावर अवलंबून राहण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
नव्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात बारामती, दौंड आणि इंदापूर या तीन तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच खेड तालुक्यात वाढलेल्या महसुली कामकाजाचा विचार करून चाकण येथेही स्वतंत्र अपर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार मोठा असून एकूण १३ तालुके आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना विविध महसुली व जमीनविषयक कामांसाठी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार जावे लागत होते. वाढत्या दावे, अपिले आणि सुनावण्यांमुळे अनेक प्रकरणे दोन ते तीन वर्षे प्रलंबित राहत असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती.सध्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांकडे जमीनविषयक दावे, अकृषिक परवाने, गौण खनिज प्रकरणे, पुनर्वसन, कुळकायदा शाखा, सातबारा संगणकीकरण, जिल्हा दौरे तसेच विविध समित्यांच्या बैठका अशा अनेक जबाबदाऱ्या आहेत.
त्यामुळे प्रकरणांच्या सुनावणीसाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने निर्णय प्रक्रियेला विलंब होत होता.
बारामती येथे नव्याने अपर जिल्हाधिकारी कार्यालय सुरू झाल्यानंतर महसुली आणि जमीनविषयक अनेक सेवांचा लाभ स्थानिक स्तरावर उपलब्ध होणार असून, प्रलंबित दाव्यांचा निपटारा अधिक वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, नव्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्राबाबत नागरिकांकडून हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.
त्यानंतर शासनाकडून अंतिम अधिसूचना जारी करण्यात येणार असून, त्यानंतर कार्यालयाच्या कार्यवाहीला औपचारिक सुरुवात होणार आहे.






