स्थानिक

अंमली पदार्थांना ठाम नकार; विद्या प्रतिष्ठानमध्ये बारामती पोलिसांची विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मोहीम”

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शन;

अंमली पदार्थांना ठाम नकार; विद्या प्रतिष्ठानमध्ये बारामती पोलिसांची विद्यार्थ्यांसाठी जनजागृती मोहीम”

पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे मार्गदर्शन;

बारामती वार्तापत्र 

अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यातून तरुणाईला वाचविण्यासाठी बारामती तालुका पोलिसांनी “अंमली पदार्थ जनजागृती मोहीम” अंतर्गत विद्या प्रतिष्ठान कॉलेज, विद्यानगरी येथे विद्यार्थ्यांसाठी विशेष जनजागृती कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात अंमली पदार्थांचे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक दुष्परिणाम समजावून सांगत विद्यार्थ्यांना व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश देण्यात आला.

१ जुलै २०२६ रोजी दुपारी १२.३० ते २.०० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांची सविस्तर माहिती दिली. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी स्वतः जागरूक राहून आपल्या मित्रपरिवारात व समाजात जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अंमली पदार्थांची विक्री किंवा संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना गोपनीय माहिती देण्याचे आवाहन शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनाही करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमास विद्या प्रतिष्ठान कॉलेजचे प्राचार्य भारत शिंदे, उपप्राचार्य अंकुश खोत, पोलीस उपनिरीक्षक कल्याण शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक बगाडे, पोलीस अंमलदार निलेश वाकळे, महिला पोलीस अंमलदार स्वप्ना पोतेकर, तसेच महाविद्यालयाच्या ज्योती जगताप, अंकिता चौधर, नाझनीन खान, मुक्ता कडणे आणि अन्य शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

चौकट :

“व्यसनमुक्त समाजासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची”

अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकण्यापूर्वीच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी बारामती पोलिसांनी हाती घेतलेली ही मोहीम महत्त्वपूर्ण मानली जात आहे. युवकांनी संशयास्पद प्रकारांची माहिती पोलिसांना देऊन व्यसनमुक्त आणि सुरक्षित समाज घडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

Back to top button