क्राईम रिपोर्ट

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप लंपास करणारे तिघे जेरबंद..

तिघांना शिक्रापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप लंपास करणारे तिघे जेरबंद..

तिघांना शिक्रापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या; एक लाखांचा मुद्देमाल हस्तगत

शिक्रापूर; प्रतिनिधी

रिपेरिंगसाठी दुकानात ठेवण्यात आलेले सुमारे एक लाख रुपये किमतीचे १० इलेक्ट्रिक मोटार पंप चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले असून, त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याप्रकरणी रामदास आनंदराव सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३१(४) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या दुकानाचे शटर उघडून आरोपींनी आत प्रवेश केला. दुकानात दुरुस्तीसाठी आलेले १० इलेक्ट्रिक मोटार पंप संगनमताने चोरून नेले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी अजय हनुमंत जाधव याने साथीदार संतोष बालाजी लोहार आणि वैभव अशोक घुमरे यांच्या मदतीने चोरीचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला.

आरोपी सणसवाडी परिसरातील एल अँड टी फाट्याजवळ असल्याची माहिती डायल ११२ पथकाला मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने कारवाई करून अजय हनुमंत जाधव (वय २५), संतोष बालाजी लोहार (वय २४) आणि वैभव अशोक घुमरे (वय २१) या तिघांना ताब्यात घेतले.

त्यांना २९ जून रोजी अटक करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती. आरोपींकडून चोरीस गेलेले एक लाख रुपये किमतीचे १० इलेक्ट्रिक मोटार पंप जप्त करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस हवालदार आर. डी. मळेकर हे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलीस निरीक्षक भोसले, पोलीस हवालदार मळेकर, नितीन सुद्रीक तसेच पोलीस शिपाई नागेश वाघमारे, विकास बांगर, संतोष बाबर, ललित चक्रनारायण कृष्णा बडे यांच्या पथकाने केली.

Back to top button