स्थानिक

डाॅ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार; बारामतीत ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’चा संदेश

नागरिकांनीही आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्यांचे जतन करावे

डाॅ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पुढाकार; बारामतीत ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’चा संदेश

नागरिकांनीही आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्यांचे जतन करावे

बारामती वार्तापत्र 

पर्यावरण संरक्षण आणि हरित बारामतीच्या संकल्पाला बळ देण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने बारामती शहर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षलागवड व संवर्धन अभियान उत्साहात राबविण्यात आले. या उपक्रमातून ‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’चा संदेश देत विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

या अभियानात बारामती शहराचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, पोलीस अधिकारी, तसेच डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवडीचे महत्त्व अधोरेखित केले. केवळ वृक्ष लावणे पुरेसे नसून त्यांचे नियमित संगोपन व संवर्धन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले.

वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि घटते हरित क्षेत्र या पार्श्वभूमीवर अशा पर्यावरणपूरक उपक्रमांची आवश्यकता अधिक असल्याचे सांगत नागरिकांनीही आपल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करून त्यांचे जतन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या उपक्रमामुळे पोलीस स्टेशन परिसर अधिक हिरवागार होण्यास मदत होणार असून पर्यावरण संवर्धनाबाबत समाजात सकारात्मक जनजागृती निर्माण होण्यासही हातभार लागणार आहे.

Back to top button