सातारा

साताऱ्यात ताथवडे घाटात दरड कोसळून भीषण दुर्घटना; बारामतीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

अचानक दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.

साताऱ्यात ताथवडे घाटात दरड कोसळून भीषण दुर्घटना; बारामतीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

अचानक दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.

बारामती वार्तापत्र

राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत अपघातांच्या घटना घडत असतानाच सातारा जिल्ह्यातील फलटण–पुसेगाव मार्गावरील ताथवडे घाटात रविवारी भीषण दुर्घटना घडली. घाटातून जात असलेल्या चारचाकी वाहनावर अचानक दरड कोसळल्याने वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला.

या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाची ओळख योगेश पोपट जगताप (रा. आंबे खुर्द, ता. बारामती, जि. पुणे) अशी झाली आहे. दरड इतक्या जोरात कोसळली की वाहन पूर्णपणे दबले गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र चालकाचा जीव वाचविणे शक्य झाले नाही.

सध्या राज्यात मान्सून सक्रिय असून सातारासह डोंगराळ भागात सलग पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी डोंगरातील माती खचणे, दगड सैल होणे आणि अचानक दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत.

ताथवडे घाटातील ही दुर्घटना त्याचाच गंभीर परिणाम मानली जात आहे.
प्रशासनाने घाटरस्त्यांवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाच्या काळात डोंगरकडील रस्त्यांवर अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच दरडप्रवण भागातून जाताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात पावसामुळे अपघातांचे सत्र सुरूच असून विविध भागांत झाडे कोसळणे, रस्ते खचणे आणि पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. साताऱ्यातील ही दुर्घटना पावसाळ्यातील घाटरस्त्यांवरील धोक्याची पुन्हा एकदा जाणीव करून देणारी ठरली आहे.

Back to top button