महाबळेश्वर सहलीदरम्यान भिगवणच्या तरुणांवर हल्ला; उपचारासाठी आणत असताना एका तरुणाचा मृत्यू
घटनेमुळे भिगवण परिसरात शोककळा

महाबळेश्वर सहलीदरम्यान भिगवणच्या तरुणांवर हल्ला; उपचारासाठी आणत असताना एका तरुणाचा मृत्यू
घटनेमुळे भिगवण परिसरात शोककळा
इंदापूर :प्रतिनिधि
इंदापूर तालुक्यातील मौजे भिगवण येथील काही युवक पर्यटनासाठी महाबळेश्वर येथे गेले असताना त्यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भिगवण येथील अक्षय रमेश जाधव (वय 26) या तरुणाचा उपचारासाठी बारामतीकडे आणत असताना मृत्यू झाला.
या घटनेमुळे भिगवण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिगवण येथील काही युवक पर्यटनासाठी महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरात गेले होते. यावेळी भोसेखिंड परिसरात काही कारणावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर भिगवण येथील पाच तरुणांना बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
या हल्ल्यात अक्षय रमेश जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्यांच्या प्रकृतीची गंभीरता लक्षात घेऊन संबंधित रुग्णालयाने पुढील उपचारासाठी अन्य मोठ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला.
यानंतर अक्षय जाधव यांना रुग्णवाहिकेतून बारामतीकडे उपचारासाठी आणले जात होते. मात्र, बारामतीच्या हद्दीजवळ पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अधिकच खालावली. बारामतीतील रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेनंतर मृत तरुणाचे नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले असून संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत. या प्रकरणात नेमके कारण काय होते, हल्लेखोर कोण होते आणि मारहाणीमागील हेतू काय होता, याचा तपास पोलीस करत आहेत.
दरम्यान, या घटनेबाबत अधिकृत पोलीस माहिती आणि गुन्हा नोंद झाल्यानंतर पुढील तपशील स्पष्ट होण्याची शक्यता आहे.




