बारामती तालुक्यातील परकाळे कुटुंबीयांच्या मानाच्या अश्वांचे सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी भक्तिमय वातावरणात प्रस्थान
भाविकांनी अश्वांचे पूजन करून फुलांची उधळण

बारामती तालुक्यातील परकाळे कुटुंबीयांच्या मानाच्या अश्वांचे सोपानकाका पालखी सोहळ्यासाठी भक्तिमय वातावरणात प्रस्थान
भाविकांनी अश्वांचे पूजन करून फुलांची उधळण
उंडवडी, प्रतिनिधि
श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वांची परंपरा अंजनगाव (ता. बारामती) येथील परकाळे कुटुंबीयांनी अनेक दशकांपासून अखंडपणे जपली आहे. यंदाही परकाळे कुटुंबीयांची तिसरी पिढी ‘राजा’ आणि ‘राम’ या मानाच्या दोन अश्वांसह पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी गुरुवारी (ता. ९) सासवडकडे भक्तिभावाने रवाना झाली.
आषाढी वारीनिमित्त सासवड ते पंढरपूर या श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यात हे मानाचे अश्व अग्रभागी असतात. त्यामुळे या अश्वांना वारकरी संप्रदायात विशेष मानाचे स्थान आहे. गुरुवारी सकाळी अंजनगाव येथे टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या घोषणांनी परिसर भक्तिमय झाला होता. भाविकांनी अश्वांचे पूजन करून फुलांची उधळण करत त्यांना सासवडकडे निरोप दिला.
यावेळी पालखी सोहळा प्रमुख त्रिगुणमहाराज गोसावी, गोपाळ महाराज, प्रमोद काका काकडे, संभाजी नाना होळकर, सभापती किरणजी तावरे, अमर जाधवराव, योगेश जगताप, भरत खैरे, सुहास निंबधे, बाळासाहेब परकाळे, दिलीप परकाळे, सचिन पोंदकुले यांच्यासह वारकरी, भजनी मंडळी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मानकरी अजित परकाळे, राजेंद्र परकाळे आणि मयूर परकाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.






