बारामती एमआयडीसीत संशयित भेसळयुक्त दुधाचा टँकर टाकून चालक फरार; एफडीएच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण
कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने विविध चर्चांना उधाण

बारामती एमआयडीसीत संशयित भेसळयुक्त दुधाचा टँकर टाकून चालक फरार; एफडीएच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण
कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने विविध चर्चांना उधाण
बारामती वार्तापत्र
बारामती एमआयडीसी परिसरातील पालखी मार्गालगत असलेल्या वेस्पा कंपनीच्या मागील बाजूस संशयित भेसळयुक्त दुधाने भरलेला टँकर टाकून संबंधित चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अन्नसुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, अन्न व औषध प्रशासन (एफडीए) कडून राज्यभरात भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. काही स्तरांवर अशी चर्चा सुरू आहे की, एफडीएचे सहआयुक्त तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कठोर कारवाईच्या भीतीमुळे संबंधितांनी हे दूध खाली केले असावे. मात्र, या दाव्याला अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही.
या प्रकरणात संबंधित टँकर कुठून आला, दूध नेमके कुठे नेले जात होते, त्यात प्रत्यक्षात भेसळ होती का आणि यामागे कोणाचा सहभाग आहे, याचा तपास संबंधित यंत्रणा करत आहेत. सीसीटीव्ही फुटेज, वाहनाची नोंदणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे चालक व संबंधितांचा शोध घेतला जाणार का हे पाहावं लागणार आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.






