क्राईम रिपोर्ट

पोलीसही आता सुरक्षित नाहीत? बारामतीत पुन्हा वर्दीवर हल्ला; पोलिसाला मारहाण, सहा जणांवर गुन्हा

याआधी दोन महिला वाहतूक पोलिसांच्या कानशिलात; आता आमराईत शिपायावर हल्ला, वाढत्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

पोलीसही आता सुरक्षित नाहीत? बारामतीत पुन्हा वर्दीवर हल्ला; पोलिसाला मारहाण, सहा जणांवर गुन्हा

याआधी दोन महिला वाहतूक पोलिसांच्या कानशिलात; आता आमराईत शिपायावर हल्ला, वाढत्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बारामती वार्तापत्र

बारामती शहरात पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ल्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. काही महिन्यांपूर्वी कर्तव्यावर असलेल्या दोन महिला वाहतूक पोलिसांच्या कानशिलात मारल्याची घटना ताजी असतानाच, आता आमराई परिसरात दंगा शमविण्यासाठी गेलेल्या पोलीस शिपायालाच मारहाण करण्यात आल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शुक्रवारी (१० जुलै) पहाटे दीडच्या सुमारास आमराई परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी व गोंधळ सुरू असल्याची माहिती डायल ११२ वर मिळताच पोलीस शिपाई गिरीश नेवसे आणि तुषार शिंदे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जमाव पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी पोलिसांच्या आदेशाला जुमानण्याऐवजी शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिसांवरच हल्ला चढवला.

या हल्ल्यात पोलीस शिपाई गिरीश नेवसे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या प्रकरणी शुभम भीमराव कांबळे, विपुल अजय अवचिते, शुभम अजय अवचिते, ओम मिथुन पाटोळे, गणेश शंकर पाथरकर आणि त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह आर्म्स ॲक्टअंतर्गत बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल व्हिडिओ, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि अन्य तांत्रिक पुरावे संकलित करण्यास सुरुवात केली असून आरोपींच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचाही स्वतंत्र आढावा घेतला जात आहे. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधक कारवाईची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

या घटनेमुळे बारामतीत पोलिसांवर हल्ल्यांच्या वाढत्या मालिकेची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही वाहतूक नियमन करत असताना दोन महिला वाहतूक पोलिसांना भररस्त्यात कानशिलात मारल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता पुन्हा वर्दीवर असलेल्या पोलिसावर हल्ला झाल्याने कायद्याची भीती कमी होत चालली आहे का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, लोकसेवकांवर हात उचलणाऱ्या आणि कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. अशा प्रत्येक घटनेत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Back to top button