दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीचा बारामतीत निषेध; वकील संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
बारामती वकील संघटनेने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीचा बारामतीत निषेध; वकील संघटनेचे तहसीलदारांना निवेदन
बारामती वकील संघटनेने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध
बारामती वार्तापत्र
दिल्लीतील जंतर-मंतर येथे शांततामय आंदोलन करत असलेल्या विद्यार्थ्यांवर कथित मारहाण झाल्याच्या घटनेचा बारामती वकील संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी संघटनेने तहसीलदार, बारामती यांच्यामार्फत शासनाकडे केली.
यासंदर्भात बारामती तहसील कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात विद्यार्थ्यांवर कथितपणे करण्यात आलेली मारहाण ही लोकशाही मूल्यांवर आघात करणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी अशा प्रकारची वागणूक देणे अस्वीकार्य असून, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
बारामती वकील संघटनेने या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, नागरिकांच्या घटनात्मक अधिकारांचे संरक्षण करणे ही शासनाची जबाबदारी असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. या वेळी संघटनेचे पदाधिकारी, वकील आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.







