स्थानिक

पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल

आरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ मॅरेथॉनमुळे प्रशासनाचे आदेश

पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत तात्पुरते बदल

आरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ मॅरेथॉनमुळे प्रशासनाचे आदेश

बारामती वार्तापत्र 

आरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ मॅरेथॉन स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर रविवार, २६ जुलै रोजी पुणे, जेजुरी, सुपा आणि बारामती परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. स्पर्धकांची सुरक्षितता, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि कोंडी टाळणे या उद्देशाने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.

आदेशानुसार, सकाळी ४ ते दुपारी १२ या कालावधीत पुण्याकडून जेजुरीमार्गे सातारा, फलटण आणि बारामतीकडे जाणारी वाहतूक बंद राहणार आहे. या वाहनांसाठी सासवड–नारायणपूर–कापूरहोळ, सासवड–वीर फाटा–परिंचे–लोणंद तसेच सासवड–पानवडी–मेमाणे–पिसर्वे–सुपा हे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलसर फाटा, पारगाव मेमाणे चौक आणि कोथळे चौक येथेही वाहतुकीचे विशेष नियोजन करण्यात आले असून पुणे, बारामती, केडगाव चौफुला, सातारा आणि लोणंदकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे. तसेच सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे–बारामती, बारामती–पुणे, केडगाव चौफुला–सातारा आणि निरा–सुपा मार्गावरील वाहतूकही वळविण्यात येणार आहे.

दरम्यान, बारामती शहरात सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अथवा मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत स्पर्धा मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. मॅरेथॉनचा मार्ग विराट हॉटेल–खंडोबानगर–कारभारी सर्कल–गुणवडी चौक–इंदापूर चौक–भिगवण चौक–तीन हत्ती चौक असा निश्चित करण्यात आला असून, सायंकाळी ५.३० वाजता नटराज नाट्यमंदिर येथे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.

या कालावधीत भिगवण, पाटस, पुणे, मोरगाव आणि फलटणकडून येणाऱ्या वाहनांनी रिंगरोड, कोर्ट कॉर्नर, देशमुख चौक, रेल्वे पूल, एमआयडीसी मार्ग, मेडिकल कॉलेज मार्ग, कॅनॉल रोड तसेच इतर पर्यायी मार्गांचा वापर करावा. तीन हत्ती चौक ते सम्यक चौक हा मुख्य मार्ग दोन्ही बाजूंनी बंद राहणार असून स्थानिक रहिवाशांसाठी सेवा रस्त्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D