अजितदादांच्या पर्यावरणप्रेमाला अभिवादन; ३५० वृक्षरोपांचे वाटप
दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात दाऊदी बोहरी समाजाचा उपक्रम; सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोपांचे वितरण.

अजितदादांच्या पर्यावरणप्रेमाला अभिवादन; ३५० वृक्षरोपांचे वाटप
दिवंगत उपमुख्यमंत्री यांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात दाऊदी बोहरी समाजाचा उपक्रम; सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रोपांचे वितरण
बारामती वार्तापत्र
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी संदेश देत दाऊदी बोहरी समाजाच्या वतीने ३५० वृक्षरोपांचे मोफत वाटप करण्यात आले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
अजितदादा पवार यांनी विकासकामांसोबतच पर्यावरण संवर्धनाला नेहमीच विशेष प्राधान्य दिले होते. वृक्षलागवड, जलसंधारण, हरित परिसर निर्मिती आणि पर्यावरणपूरक उपक्रमांना त्यांनी सातत्याने चालना दिली. “एक झाड म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी दिलेली अमूल्य भेट” हा त्यांचा विचार अनेक उपक्रमांतून दिसून आला.
याच पर्यावरणप्रेमाला अभिवादन म्हणून दाऊदी बोहरी समाजाने पुतळा अनावरण सोहळ्याचे औचित्य साधत ३५० वृक्षरोपांचे वाटप केले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प करत पर्यावरण रक्षणासाठी योगदान देण्याची तयारी दर्शवली.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असल्याचे सांगत प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे जतन करावे, असे आवाहन केले. स्मारक उभारण्याबरोबरच वृक्षलागवडीसारख्या विधायक उपक्रमातून दिवंगत अजितदादा पवार यांच्या विचारांना खरी आदरांजली वाहिली जात असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
दाऊदी बोहरी समाजाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देणारा हा उपक्रम ठरला.







