आपला जिल्हा

एआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य; शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा : हर्षवर्धन पाटील

निरा-भिमा साखर कारखान्यावर ऊस पीक परिसंवाद; वेदर स्टेशन, मोबाईल मार्गदर्शन आणि अनुदानाच्या योजनेची घोषणा

एआय तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत वाढ शक्य; शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा : हर्षवर्धन पाटील

निरा-भिमा साखर कारखान्यावर ऊस पीक परिसंवाद; वेदर स्टेशन, मोबाईल मार्गदर्शन आणि अनुदानाच्या योजनेची घोषणा

इंदापूर, आदित्य बोराटे –

ऊस शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाणी व खतांची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो. त्याचबरोबर ऊस उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची अपेक्षा असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले.

शहाजीनगर (ता. इंदापूर) येथील निरा-भिमा सहकारी साखर कारखान्यावर आयोजित ‘ऊस पिकातील कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञान’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते. प्रारंभी कर्मयोगी शंकररावजी पाटील व लोकनेते शहाजीराव पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन हर्षवर्धन पाटील व अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

हर्षवर्धन पाटील म्हणाले, शेतीखालील क्षेत्र कमी होत असताना पारंपरिक पद्धतीने ऊस लागवड करून उत्पादन वाढविण्याला मर्यादा आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. निरा-भिमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तसेच बावडा येथील शहाजीबागेतील शेतात एआय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने घेतलेले ऊस पीक पारंपरिक पद्धतीपेक्षा अधिक जोमदार असल्याचा अनुभव आला आहे.

कारखान्याच्या कार्यक्षेत्रात पाच स्वयंचलित हवामान केंद्रे (वेदर स्टेशन) उभारण्यात येणार असून, प्रारंभी १२५ ते १५० शेतकऱ्यांना या प्रकल्पात सहभागी करून घेतले जाणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पाणी व खत व्यवस्थापन, रोगनियंत्रण आणि आवश्यक फवारणीबाबत वेळेवर मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे. या योजनेसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून अनुदान मिळणार असून, उर्वरित प्रति हेक्टर रु. ६,७५० इतका खर्च निरा-भिमा कारखाना उचलणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ही रक्कम नंतर ऊसबिलातून समायोजित करण्यात येणार असून अधिकाधिक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. डी. कडलग यांनी एआय तंत्रज्ञानामुळे जमिनीतील हवा व पाण्याचे प्रमाण, खतांचा कार्यक्षम वापर आणि वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक सिंचनाचे अचूक नियोजन शक्य होत असल्याचे सांगितले. ऊस उत्पादकांसाठी हे तंत्रज्ञान वापरणे सोपे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रमुख ऊस प्रजनन विभागाचे डॉ. के. व्ही. सुशीर यांनी व्हीएसआय-२११२१ आणि व्हीएसआय-२५१२१ या नव्या ऊस वाणांची माहिती देत, हे वाण अधिक उत्पादनक्षम आणि साखर उताऱ्यासाठी उपयुक्त असून लवकरच शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येतील, असे सांगितले.

विज्ञान केंद्र, बारामतीचे एआय विभाग प्रमुख तुषार जाधव यांनी एआय तंत्रज्ञानामुळे पाण्याचा अपव्यय कमी होऊन जमिनीचे क्षारीकरण रोखण्यास मदत होत असल्याचे सांगितले. उपग्रह प्रणाली आणि सेन्सरच्या साहाय्याने शेतकऱ्यांना पिकासंदर्भातील अचूक माहिती मोबाईलवर उपलब्ध होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.कार्यकारी संचालक नवनाथ सपकाळ यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास अध्यक्षा भाग्यश्री पाटील, उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, संचालक, पदाधिकारी आणि कार्यक्षेत्रातील मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. आभार अॅड. अनिल पाटील यांनी मानले.

चौकट : निरा-भिमा कारखाना १६ बंधाऱ्यांची जबाबदारी स्वीकारणार

निरा-भिमा सहकारी साखर कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील निरा नदीवरील कळंब ते निरा नरसिंहपूरदरम्यानचे १३ आणि भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू व शेवरे येथील तीन अशा एकूण १६ बंधाऱ्यांमध्ये पाणी अडविण्याची तसेच आवश्यक त्या ठिकाणी गळती रोखण्याची जबाबदारी स्वीकारण्यात येणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या उपक्रमामुळे मे महिन्यापर्यंत बंधाऱ्यांमध्ये पाणी टिकून राहण्यास मदत होईल आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D