पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १.०८ लाख थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
जिल्ह्यातील ११३ पात्र शेतकरी मयत

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून १.०८ लाख थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
जिल्ह्यातील ११३ पात्र शेतकरी मयत
पुणे;प्रतिनिधि
राज्य शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ४१ थकीत कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड केला असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, आत्मविश्वास वाढवणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
योजनेची प्रभावी, पारदर्शक आणि वेळेत अंमलबजावणी व्हावी यासाठी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था (पुणे ग्रामीण) कार्यालयाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला कर्जदारांचा तपशील पोर्टलवर अपलोड करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार बँकेने सर्व पात्र कर्जदारांची माहिती पोर्टलवर अपलोड केली आहे.
तालुकानिहाय अपलोड करण्यात आलेल्या थकीत कर्जदारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे :
आंबेगाव – ३,३९०
बारामती – १३,७२८
भोर – ७,२४२
दौंड – १९,५६२
हवेली – ४,१६८
इंदापूर – १८,८१८
जुन्नर – ७,७७८
खेड – ७,८५३
मावळ – ५,१७२
मुळशी – २,३८७
पुरंदर – ७,९०३
शिरूर – ८,४५२
वेल्हा – १,८८८
दरम्यान, जिल्ह्यातील ११३ पात्र शेतकरी मयत असून त्यांच्या वारसांची नोंद अद्याप झालेली नसल्यामुळे संबंधित खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करता आलेली नाही. तसेच २९ पात्र सभासदांचे आधार क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यांचाही तपशील अपलोड होऊ शकलेला नाही.
यामुळे मयत सभासदांच्या वारसांनी तातडीने वारस नोंदणी करून घ्यावी तसेच आधार क्रमांक उपलब्ध नसलेल्या पात्र सभासदांनी आधार क्रमांक सादर करावा, जेणेकरून त्यांची माहितीही पोर्टलवर अपलोड करून योजनेचा लाभ मिळू शकेल, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.







