राजकीय

धनगर आरक्षणासाठी बारामतीत सरकारविरोधात निषेध; कपाळी काळ्या पट्ट्या बांधून व्यक्त केला संताप

गेल्या १२ वर्षांत नेमकी कोणती कार्यवाही झाली याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी

धनगर आरक्षणासाठी बारामतीत सरकारविरोधात निषेध; कपाळी काळ्या पट्ट्या बांधून व्यक्त केला संताप

गेल्या १२ वर्षांत नेमकी कोणती कार्यवाही झाली याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी

बारामती वार्तापत्र

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीवरून बारामतीतील प्रशासकीय भवनासमोर २९ जुलै रोजी ‘विश्वासघात दिवस’ पाळत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. आंदोलकांनी कपाळी काळ्या पट्ट्या बांधून सरकारविरोधात घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंदोलकांनी सांगितले की, २९ जुलै २०१४ रोजी बारामती येथे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू असताना तत्कालीन विरोधी पक्षनेत्यांनी सत्ता मिळाल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या आश्वासनाला तब्बल १२ वर्षे पूर्ण होत असतानाही प्रश्न कायम असल्याने समाजात तीव्र नाराजी आहे.

क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे आणि धनगर विवेक जागृती अभियानाचे विक्रम ढोणे यांनी सरकारवर टीका करत, धनगर आरक्षणाबाबत गेल्या १२ वर्षांत नेमकी कोणती कार्यवाही झाली याबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची मागणी केली.

तसेच, राज्य सरकारने मंत्री समिती स्थापन करून केंद्र सरकारकडे एसटी आरक्षणासाठी शिफारस करावी आणि केंद्र सरकारनेही समन्वय समिती स्थापन करून प्रक्रिया गतीमान करावी, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी, धनगर समाजाची सातत्याने फसवणूक झाल्याचा आरोप करत पारंपरिक भंडाऱ्याऐवजी कपाळी काळ्या पट्ट्या बांधून निषेध नोंदविण्यात आला.

उपविभागीय अधिकारी, बारामती यांच्या वतीने नायब तहसीलदार नामदेव काळे यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारले.
या आंदोलनात विक्रम ढोणे, कल्याणी वाघमोडे, ताई मदने, तानाजी कटरे, सुजित वाघमोडे, विक्रांत काळे, गणपत देवकाते, सुरेश खताळ, जयाप्पा खरात, अंकुश मुढे, बाबू मदने, नवनाथ सूळ, विनय शेळके, संतोष तोरवे यांच्यासह धनगर समाजातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button

दिवंगत लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांच्या कार्याला, दूरदृष्टीला आणि जनसेवेच्या अविस्मरणीय योगदानाला सादर प्रणाम.

https://youtu.be/y0HjjzvjpNM?si=ZKAYhb_IBjh73M7D