अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीने मोर्चा का काढला नाही?; निवास शेळके यांचा सवाल
हा मोर्चा केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप..

अजित पवारांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीने मोर्चा का काढला नाही?; निवास शेळके यांचा सवाल
हा मोर्चा केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप..
इंदापूर, आदित्य बोराटे –
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयी केलेल्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून शुक्रवारी (दि.७) काढण्यात आलेल्या मोर्चावर काँग्रेसचे इंदापूर तालुकाध्यक्ष निवास शेळके यांनी टीका केली आहे. हा मोर्चा केवळ राजकीय स्टंट असल्याचा आरोप करत, स्वर्गीय अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन का केले नाही?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
शेळके म्हणाले, “आज ज्या उत्साहाने हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला, त्याच पद्धतीने जर स्वर्गीय अजित पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी, या मागणीसाठी मोर्चा काढला असता, तर काँग्रेसचा तालुकाध्यक्ष म्हणून मी सर्वप्रथम त्या मोर्चात सहभागी झालो असतो.”
ते पुढे म्हणाले, “जर खरोखरच न्यायासाठी आंदोलन करायचे होते, तर गृह खात्याच्या विरोधात धरणे किंवा मोर्चा काढून चौकशीची मागणी करायला हवी होती. मात्र तसे न करता, केवळ सुनेत्रा पवार यांच्यावरील कथित टीकेच्या निषेधापुरते आंदोलन करण्यात आले.”
अजित पवार यांच्या मृत्यूच्या चौकशीसाठी काँग्रेसने पुढाकार घेऊन आंदोलने केली होती. मात्र त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने कोणतीही आंदोलनात्मक भूमिका घेतली नाही. त्या वेळी मूग गिळून गप्प का बसले, असा प्रश्नही शेळके यांनी उपस्थित केला.
दरम्यान, निवास शेळके यांनी केलेली ही टीका ही त्यांची राजकीय भूमिका असून, संबंधित आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.





