स्थानिक

नवा गणवेश, नवा उत्साह अन् चेहऱ्यावर निरागस हास्य!; बारामती नगर परिषद शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगले वातावरण

नवा गणवेश, नवा उत्साह अन् चेहऱ्यावर निरागस हास्य!; बारामती नगर परिषद शाळांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

देशभक्तीपर कार्यक्रमांनी रंगले वातावरण

बारामती वार्तापत्र 

स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि नव्या गणवेशातील चिमुकल्यांचे निरागस हास्य, अशा आनंदी वातावरणात बारामती नगर परिषद शाळांमध्ये भारताचा ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नव्या गणवेशात टापटीप उपस्थित राहत राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विद्यार्थ्यांना नवीन गणवेशाचे वाटप करण्यात आले होते. काही अपरिहार्य कारणे आणि तांत्रिक अडचणींमुळे गणवेश वाटपाला विलंब झाला होता. मात्र, गणवेश मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि उत्साह विशेष आकर्षण ठरला.

आज सकाळी नव्या गणवेशात सजून आलेल्या विद्यार्थ्यांनी तिरंग्याच्या साक्षीने स्वातंत्र्यदिनाचा उत्साह द्विगुणित केला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण केली.

नव्या गणवेशातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य, डोळ्यांतील चमक आणि देशभक्तीचा उत्साह पाहून ‘आजचा आनंद म्हणजे उद्याच्या भारताच्या उज्ज्वल भविष्याची चाहूल’ असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

यावेळी बारामती नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षा तथा शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापती सौ. श्वेता नाळे म्हणाल्या, “नगर परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला चांगल्या सुविधा, दर्जेदार शिक्षण आणि आनंददायी शैक्षणिक वातावरण मिळावे, हा आमचा सातत्याने प्रयत्न आहे. नवीन गणवेश परिधान करून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हास्य पाहणे, हीच आमच्यासाठी सर्वात मोठी समाधानाची बाब आहे. या चिमुकल्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नगर परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.”

नगराध्यक्ष श्री. सचिन सातव म्हणाले, “आदरणीय अजितदादांनी कायमच नगरपालिकेतील विद्यार्थ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवले. ‘आपला विद्यार्थी घडला पाहिजे’, हे अजितदादांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता आपल्या सर्वांची सामूहिक आहे. विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण, आवश्यक सुविधा आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी नगर परिषद सातत्याने काम करत आहे. या संपूर्ण प्रक्रियेवर श्रीमती सुनेत्रा वहिनी स्वतः बारकाईने लक्ष ठेवून असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे.”

मुख्याधिकारी श्री. पंकज भुसे यांनी सांगितले, “नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक सुविधा आणि शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी प्रशासन नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहे. गणवेश वाटपातील काही तांत्रिक अडचणी दूर करून विद्यार्थ्यांना नवीन गणवेश उपलब्ध करून देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये आणि त्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”

नव्या गणवेशात स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. शिक्षण, सुविधा आणि आनंददायी वातावरणाच्या माध्यमातून या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नगर परिषदेकडून प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी दिसून आले.

Back to top button