१६ ऑक्टोबरला मोदी बारामतीत; शरद पवारांकडून ‘प्रेरणास्थळा’ची पाहणी
गौतम बुद्धांचा ९ फूट उंच पुतळा

१६ ऑक्टोबरला मोदी बारामतीत; शरद पवारांकडून ‘प्रेरणास्थळा’ची पाहणी
गौतम बुद्धांचा ९ फूट उंच पुतळा
बारामती वार्तापत्र
बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथे उभारण्यात आलेल्या ‘प्रेरणास्थळा’ची राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक तथा राज्यसभा खासदार शरद पवार यांनी पाहणी केली. या प्रेरणास्थळाचे उद्घाटन येत्या १६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र बागेमध्ये उभारण्यात आलेल्या या प्रेरणास्थळात गौतम बुद्धांचा ९ फूट उंच पुतळा बसविण्यात आला आहे. तसेच विविध महापुरुषांचे कार्य आणि योगदान नव्या पिढीसमोर मांडण्यासाठी त्यांच्या छायाचित्रांचा आणि माहितीचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रेरणास्थळामध्ये राजर्षी शाहू महाराज, अहिल्याबाई होळकर, सयाजीराव गायकवाड, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि शारदाबाई पवार यांच्यासह विविध महापुरुषांच्या कार्याची माहिती नागरिकांना पाहता येणार आहे.
शरद पवार यांनी पाहणीदरम्यान प्रेरणास्थळाच्या कामाची तसेच आगामी उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची माहिती घेतली. विद्या प्रतिष्ठानचा स्थापना दिवसही १६ ऑक्टोबर रोजी असल्याने याच दिवशी या वास्तूचे उद्घाटन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याबाबत यापूर्वी २ ऑक्टोबर आणि १६ ऑक्टोबर या दोन तारखांची चर्चा होती. अखेर १६ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्रेरणास्थळाचे उद्घाटन होणार असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या स्मरणार्थ जिरायती भागात बारव उभारण्याची संकल्पनाही असल्याचे पवार यांनी यापूर्वी सांगितले आहे.
दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील अलीकडच्या भेटीगाठींच्या पार्श्वभूमीवर मोदींचा बारामती दौरा चर्चेचा विषय ठरत आहे. मात्र, १६ ऑक्टोबरचा दौरा हा विद्या प्रतिष्ठानच्या प्रेरणास्थळाच्या उद्घाटनासाठी असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे.
प्रेरणास्थळाच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाकडे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.






