राजकीय

‘सरकार ऐकत नसेल तर काय करू?’; मुख्यमंत्र्यांवरील प्रश्नावर लक्ष्मण हाके बारामतीत पत्रकारांवर संतापले

‘तुम्ही सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका का करत नाही?’

‘सरकार ऐकत नसेल तर काय करू?’; मुख्यमंत्र्यांवरील प्रश्नावर लक्ष्मण हाके बारामतीत पत्रकारांवर संतापले

‘तुम्ही सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका का करत नाही?’

बारामती वार्तापत्र 

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेणारे ओबीसी नेते लक्ष्मण हाके गुरुवारी (दि. २० ऑगस्ट) बारामतीतील पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांवर संतापल्याचे पाहायला मिळाले.

‘तुम्ही सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका का करत नाही?’ असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर हाके यांनी संतप्त प्रतिक्रिया देत, ‘मुख्यमंत्र्यांनी ओबीसींचे आरक्षण घालवले आहे; आता काय तुमच्यासमोर आत्महत्या करू का?’ असा सवाल केला.

ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर आपण सातत्याने सरकारविरोधात भूमिका मांडत असल्याचे हाके यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का पोहोचवला असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर टीका करताना त्यांनी त्यांच्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘मुख्यमंत्र्यांनी काढलेला जीआर महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर फाडणारा मीच आहे,’ असे सांगत हाके यांनी आपल्या आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना ‘तुम्ही कोणता चष्मा घालून आला आहात? काय बोलत आहात? तुमचा अभ्यास वाढवा,’ अशा शब्दांत त्यांनी प्रतिक्रिया दिली.

‘ओबीसींचे आरक्षण संपले’

महाराष्ट्रातील ओबीसींचे आरक्षण संपल्याचा दावा करत हाके यांनी ओबीसी समाजाने आपल्या आंदोलनाच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन केले.

आगामी १ सप्टेंबरच्या आंदोलनाचा उल्लेख करत हाके यांनी राज्यातील ओबीसी समाज मोठ्या संख्येने आपल्या मागे उभा राहील, असा दावा केला. ‘एक सप्टेंबरला ओबीसी माझ्या मागे आले नाहीत, तर माझी चळवळ आणि राजकारण बंद करून मी घरात बसेन,’ असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बारामतीतील पत्रकार परिषदेत हाके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावरही टीका केली. संसदेत ओबीसींच्या प्रश्नावर त्या पुरेसे बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

हाके यांच्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री, ओबीसी आरक्षण आणि आगामी आंदोलनावरून झालेल्या प्रश्नोत्तरांमुळे वातावरण काही काळ तापल्याचे पाहायला मिळाले.

Back to top button