क्राईम रिपोर्ट

बारामतीत गुन्हेगारांना कायद्याचा दणका; खून शून्यावर, जबरी चोरीत ४३% घट

Breach of Bond, तडीपार अन् MPDAचा धाक

बारामतीत गुन्हेगारांना कायद्याचा दणका; खून शून्यावर, जबरी चोरीत ४३% घट

Breach of Bond, तडीपार अन् MPDAचा धाक

बारामती वार्तापत्र

बारामती विभागातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांना सकारात्मक परिणाम मिळत असल्याचे तुलनात्मक आकडेवारीतून समोर आले आहे. बारामती शहर, बारामती तालुका आणि माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दहा निवडक गंभीर गुन्ह्यांचा विचार करता, सन २०२५ जुलै अखेरच्या तुलनेत सन २०२६ जुलै अखेर गुन्ह्यांची संख्या १७० वरून १५९ इतकी झाली आहे. त्यामुळे एकूण ११ गुन्ह्यांची म्हणजेच सुमारे ६.५ टक्क्यांनी घट झाली आहे.

गुन्हे शीर्षकनिहाय पाहता खुनाचे गुन्हे २ वरून शून्यावर आले असून १०० टक्के घट नोंदली गेली आहे. खुनाचा प्रयत्न ११ वरून १०, बलात्काराचे गुन्हे १६ वरून १३, जबरी चोरी १४ वरून ८ आणि चैन स्नॅचिंगचे गुन्हे १० वरून ७ झाले आहेत. दुखापतीचे गुन्हेदेखील ९१ वरून ८६ इतके कमी झाले आहेत.

विशेष म्हणजे खून आणि खुनाचा प्रयत्न हे दोन्ही गुन्हे एकत्रित पाहता त्यांची संख्या १३ वरून १० झाली असून सुमारे २३ टक्के घट झाली आहे. जबरी चोरीत सुमारे ४३ टक्के, चैन स्नॅचिंगमध्ये ३० टक्के तर बलात्काराच्या गुन्ह्यांत सुमारे १९ टक्के घट झाली आहे. सदोष मनुष्यवध आणि दरोडा तयारी या दोन्ही गुन्हे शीर्षकांमध्ये दोन्ही वर्षांच्या तुलनात्मक कालावधीत एकही गुन्हा नोंदलेला नाही.

मात्र, काही गुन्ह्यांमध्ये वाढही झाली आहे. दरोड्याचे गुन्हे २ वरून ४, तर गर्दीमारामारीचे गुन्हे २४ वरून ३१ झाले आहेत. या वाढीची स्वतंत्र नोंद घेऊन संबंधित पोलीस स्टेशननिहाय विश्लेषण करण्यात येत असून आरोपी, रेकॉर्डवरील गुन्हेगार, गुन्हेगारी गट आणि उपद्रवी व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून प्रतिबंधक कारवाई अधिक तीव्र करण्यात येत आहे.

शहर आणि माळेगावमध्ये घट

बारामती शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहा निवडक गुन्ह्यांची संख्या ६२ वरून ५२ झाली असून १० गुन्ह्यांची म्हणजे सुमारे १६ टक्के घट झाली आहे.

माळेगाव पोलीस स्टेशनमध्ये ही संख्या ३८ वरून ३० इतकी कमी झाली असून ८ गुन्ह्यांची म्हणजे सुमारे २१ टक्के घट नोंदविण्यात आली आहे.

बारामती तालुका पोलीस स्टेशनमध्ये मात्र निवडक गुन्ह्यांची एकूण संख्या ७० वरून ७७ झाली आहे. असे असले तरी खुनाचा प्रयत्न ५ वरून २, जबरी चोरी ७ वरून ५, चैन स्नॅचिंग ७ वरून ३ आणि दुखापतीचे गुन्हे ३५ वरून ३३ इतके कमी झाले आहेत. तालुका पोलीस स्टेशनमधील एकूण वाढीमध्ये गर्दीमारामारीच्या गुन्ह्यांचा मोठा वाटा असल्याने त्यावर स्वतंत्र प्रतिबंधक धोरण राबविण्यात येत आहे.

गुन्हा घडू न देणे’ यावर पोलिसांचा भर

बारामती विभाग पोलिसांनी केवळ गुन्हा घडल्यानंतर तपास करण्याऐवजी गुन्हा घडण्यापूर्वीच गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला आहे. रेकॉर्डवरील गुन्हेगारांची नियमित तपासणी, तडीपार आरोपींचे चेकिंग, दिवस-रात्र पेट्रोलिंग, नाकाबंदी, संवेदनशील ठिकाणी दृश्यमान पोलीस उपस्थिती, फरार व पाहिजे आरोपींचा शोध, वॉरंट बजावणी आणि गुन्हेगारी टोळ्यांवर लक्ष ठेवले जात आहे.

प्रतिबंधक कारवाईअंतर्गत Breach of Bond, प्रतिबंधक बॉण्ड आणि तडीपार कारवाई प्रभावीपणे राबविण्यात येत असून पात्र प्रकरणांमध्ये महाराष्ट्रातील प्रतिबंधक कायद्यांच्या तरतुदींचा वापर केला जात आहे. सार्वजनिक सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या पात्र प्रकरणांमध्ये MPDA अंतर्गत प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी प्रस्ताव सादर करण्यावरही भर देण्यात येत आहे.

पोलिसांच्या मते, बॉण्ड हा केवळ इशारा नसून कायदेशीर बंधन आहे. त्याच्या अटींचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कार्यवाही केली जात आहे. त्यामुळे सराईत गुन्हेगार आणि Repeat Offenders वर सातत्यपूर्ण कायदेशीर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महिला व बालकांच्या सुरक्षेला प्राधान्य

महिला, मुली आणि बालकांची सुरक्षा ही बारामती विभाग पोलिसांची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महिला किंवा बालकांशी संबंधित तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांची तातडीने आणि संवेदनशीलतेने दखल घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार पोलीस संरक्षण, वैद्यकीय मदत, समुपदेशन आणि इतर सक्षम यंत्रणांशी समन्वय साधला जात आहे.

बलात्काराच्या गुन्ह्यांची संख्या १६ वरून १३ झाली असली तरी केवळ आकडेवारीतील घट हे अंतिम उद्दिष्ट नसून प्रत्येक महिला आणि बालकाला निर्भयपणे पोलिसांकडे जाता यावे, यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

वाढलेल्या गुन्ह्यांवरही लक्ष

दरोडा आणि गर्दीमारामारीसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची बाब पोलिसांकडून लपविण्यात आलेली नसून त्याचे स्वतंत्र विश्लेषण केले जात आहे. संबंधित आरोपी, गुन्हेगारी गट आणि उपद्रवी व्यक्तींवर लक्ष केंद्रित करून प्रतिबंधक तसेच तपासात्मक कारवाई तीव्र करण्यात आली आहे.

पोलिस विभागाचे उद्दिष्ट केवळ आकडेवारी चांगली दाखविणे नसून गुन्ह्यामागील कारण शोधणे, पुढील गुन्हा रोखणे आणि नागरिकांना प्रत्यक्ष सुरक्षितता प्रदान करणे हे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, नागरिकांनी अफवा किंवा अपुष्ट सोशल मीडिया संदेशांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद व्यक्ती, घटना किंवा हालचाल निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

“गुन्हेगारांवर कायद्याचा वचक — नागरिकांच्या मनात सुरक्षेचा विश्वास” या उद्देशाने बारामती शहर, बारामती तालुका आणि माळेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार २४ तास कार्यरत असून आगामी काळातही गुन्हेगारीचा आलेख आणखी खाली आणण्यासाठी प्रतिबंधक व कायदेशीर कारवाई प्रभावीपणे सुरू ठेवण्यात येणार आहे.

Back to top button