स्थानिक

‘आता तरी जागे व्हा!’ बारामतीतील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर नागरिकांचा आक्रोश

कुत्र्यांचा कळप मागे लागतोय, नागरिकांचा जीव टांगणीला

‘आता तरी जागे व्हा!’ बारामतीतील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर नागरिकांचा आक्रोश

कुत्र्यांचा कळप मागे लागतोय, नागरिकांचा जीव टांगणीला

बारामती वार्तापत्र 

शांत, स्वच्छ आणि सुरक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या बारामती शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव नागरिकांच्या चिंतेचा विषय बनला आहे. शहरातील विविध भागांत मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असून, नागरिकांचा पाठलाग करणे, दुचाकीस्वारांच्या मागे धावणे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना त्रास देण्याच्या घटना वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.

नुकतीच शुक्रवारी पहाटे मोरगाव रोड परिसरात एका लहान मुलावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

विशेषतः सकाळी आणि सायंकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणारे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच दुचाकीस्वार यांना मोकाट कुत्र्यांचा सर्वाधिक धोका जाणवत आहे. अचानक कुत्र्यांचा कळप मागे लागल्याने दुचाकीस्वारांचा अपघात होण्याची शक्यताही निर्माण होत आहे.

नागरिकांकडून या समस्येबाबत वारंवार तक्रारी केल्या जात असतानाही कायमस्वरूपी आणि प्रभावी उपाययोजना होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा त्यापूर्वीच प्रशासनाने या समस्येची दखल घेणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता नगरपरिषदेने संबंधित विभागाच्या माध्यमातून नियमानुसार आवश्यक उपाययोजना करून या समस्येवर प्रभावी नियंत्रण मिळवावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

बारामतीकरांची मागणी कोणतीही अवाजवी नसून, शहरात सुरक्षित, शांत आणि निर्भय वातावरणात जगण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला मिळावा, एवढीच अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासनाने भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर तातडीने, ठोस आणि कालबद्ध उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

Back to top button