महिलेच्या गळ्यातून हिसकावले १.७० लाखांचे मंगळसूत्र; बारामती पोलिसांनी शोधून केले परत
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास

महिलेच्या गळ्यातून हिसकावले १.७० लाखांचे मंगळसूत्र; बारामती पोलिसांनी शोधून केले परत
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र लंपास.
बारामती वार्तापत्र
बारामती तालुक्यातील कन्हेरी परिसरात महिलेच्या गळ्यातील १ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून चोरी करणाऱ्या आरोपीचा बारामती तालुका पोलिसांनी छडा लावला आहे.
पोलिसांनी २२ वर्षीय आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेले १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत केले. विशेष म्हणजे, हे मंगळसूत्र ३१ ऑगस्ट रोजी पोलिसांनी फिर्यादी महिलेला परत केले.
कन्हेरीत पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळोची येथील अनुराधा संतोष पागळे (वय ३४) या ५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.५५ वाजता कन्हेरीहून जळोचीच्या दिशेने मोटारसायकलवरून जात होत्या.
कन्हेरी गावाच्या हद्दीतील लाकडी-जळोची रोडवर बटरफ्लाय गार्डनच्या पुढे मागून मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांना थांबवले. याचवेळी दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील दोन पदरी फॅन्सी मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून नेले.
या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🔍 तपासातून आरोपी जेरबंद
गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे यांनी केला. तपासादरम्यान पोलिसांनी गणेश मंगेश काळे (वय २२, रा. कुळधरण, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) याला अटक केली.
त्याच्याकडून चोरीस गेलेले १३ ग्रॅम वजनाचे, अंदाजे १ लाख ७० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले.
👮♂️ पोलिसांकडून मुद्देमाल फिर्यादीच्या स्वाधीन
हस्तगत केलेले सोन्याचे मंगळसूत्र भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम १०६(३) अन्वये ३१ ऑगस्ट २०२६ रोजी फिर्यादी अनुराधा पागळे यांना परत करण्यात आले.
या कारवाईबद्दल बारामती तालुका पोलिसांच्या तपासाची आणि कार्यक्षमतेची चर्चा होत आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष बडे आणि मुद्देमाल कारकून भारत खंडागळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.






