राजकीय

मोदी बारामतीत येणार? विद्या प्रतिष्ठानमध्ये तयारीला वेग; शरद पवारांच्या निमंत्रणाची चर्चा

दौऱ्याने राजकीय वातावरण तापले

मोदी बारामतीत येणार? विद्या प्रतिष्ठानमध्ये तयारीला वेग; शरद पवारांच्या निमंत्रणाची चर्चा

दौऱ्याने राजकीय वातावरण तापले.

बारामती वार्तापत्र 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संभाव्य बारामती दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्या प्रतिष्ठानमध्ये कार्यक्रमाच्या नियोजनाला वेग आला आहे.

१६ ऑक्टोबर रोजी विद्या प्रतिष्ठानच्या नक्षत्र गार्डन येथे प्रेरणास्थळासह भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विद्या प्रतिष्ठानचा १६ ऑक्टोबर रोजी स्थापना दिवस असल्याने या विशेष कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मोदींचा बारामती दौरा निश्चित होतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संभाव्य दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर स्वागत, सुरक्षा व्यवस्था आणि कार्यक्रमाचे नियोजन याबाबत विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते युगेंद्र पवार, विद्या प्रतिष्ठानचे विश्वस्त किरण गुजर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

🔥 मोदी–पवार एकाच मंचावर? बारामतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण!
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार हे एकाच कार्यक्रमासाठी बारामतीत उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने या दौऱ्याला राजकीयदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

विकास, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर येणार का, याची उत्सुकता बारामतीकरांना लागली आहे.

दरम्यान, मोदींच्या संभाव्य दौऱ्याची अधिकृत घोषणा आणि अंतिम कार्यक्रम निश्चित होण्याची प्रतीक्षा कायम आहे. मात्र, विद्या प्रतिष्ठानमध्ये तयारीच्या हालचाली सुरू झाल्याने बारामतीत या दौऱ्याची चर्चा रंगली आहे.

Back to top button