
गोविंदांचा थरार, नृत्याची रंगत अन् चांडाळ चौकडीच्या करामती;लोकनेते प्रदीप गारटकर मित्र परिवारातर्फे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन
मुंबईच्या महिला गोविंदा पथकाचा सात थरांचा थरार
इंदापूर, –
गोविंदांच्या मानवी मनोऱ्यांचा थरार,नृत्याची रंगत आणि चित्तथरारक करामतींचा अनुभव देणारा इंदापूरमधील भव्य दहीहंडी उत्सव रविवार (ता. ६) सप्टेंबर रोजी रंगणार आहे. लोकनेते प्रदीपदादा गारटकर मित्रपरिवाराच्या वतीने सायंकाळी सहा वाजता नवीन तहसील कचेरी शेजारील शंभर फुटी रोड येथे या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने इंदापूर शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, यंदाच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आणि साहसी कलांचे सादरीकरण हे विशेष आकर्षण ठरणार आहे. युवकांसह शहरातील नागरिकांना या उत्सवाची उत्सुकता लागली आहे.

चांडाळ चौकडीच्या करामतींची उत्सुकता
बारामती येथील चांडाळ चौकडीच्या थरारक करामती हा कार्यक्रमाचा प्रमुख आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यांच्या साहसी सादरीकरणातून उपस्थितांना रोमांचक अनुभव घेता येणार आहे. तसेच पुणे येथील नर्गिस पुणेकर यांच्या नृत्याविष्काराची मेजवानीही रसिकांना मिळणार आहे.
मुंबईच्या महिला गोविंदा पथकाचा सात थरांचा थरार
यंदाच्या दहीहंडीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील पहिल्या महिला सात थर लावणाऱ्या मुंबई येथील पार्ल स्पोर्ट्स क्लबच्या दहीहंडी संघाची उपस्थिती. महिला गोविंदा पथकाकडून सादर होणाऱ्या सात थरांच्या मानवी मनोऱ्याच्या कौशल्याकडे इंदापूरकरांचे विशेष लक्ष लागले आहे.
दहीहंडीच्या माध्यमातून पारंपरिक उत्सवाला आधुनिक सांस्कृतिक कार्यक्रमांची जोड देतानाच युवकांना क्रीडा, साहस आणि संघभावनेची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य दहीहंडी उत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन लोकनेते प्रदीपदादा गारटकर मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.






