बारामती हादरली! ४७८ किलो गांजाच्या गूढ ड्रमचा उलगडा; विकी कांबळे पोलिसांच्या जाळ्यात
जळोचीतील दोन ड्रम ते ओडिशापर्यं जळोचीलसा पडलेल्यव

बारामती हादरली! ४७८ किलो गांजाच्या गूढ ड्रमचा उलगडा; विकी कांबळे पोलिसांच्या जाळ्यात
जळोचीतील दोन ड्रम ते ओडिशापर्यंत!
बारामती वार्तापत्र
जळोचीतील निर्जन शेतात सापडलेल्या दोन गूढ ड्रममधील तब्बल ४७८.९५० किलो गांजाच्या प्रकरणाचा तपास आता आंतरराज्यीय नेटवर्कच्या मुळाशी पोहोचला आहे. जवळपास सहा महिन्यांच्या सातत्यपूर्ण तपासानंतर बारामती शहर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी विकी विजय कांबळे याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दि. २८ फेब्रुवारी २०२६ रोजी जळोची-पिंपळी रोड परिसरातील शेतात पोलिसांना दोन मोठे प्लास्टिक ड्रम आढळले. या ड्रममध्ये तब्बल ४६५ पॅकेट्समधून ४७८.९५० किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थ आढळला. त्याची अंदाजे किंमत २ कोटी ३९ लाख ४७ हजार ५०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मात्र, गांजा सापडला; पण तो आणला कोणी? कुठून आला? कोणाकडे जाणार होता? या प्रश्नांची उत्तरे शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.
बारामती शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत CDR, Dump Data, IMEI Mapping, मोबाईल लोकेशन, CCTV फुटेज, वाहनांच्या हालचाली आणि सहआरोपींची चौकशी यांचा आधार घेत तपास पुढे नेला. या तपासातून प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे, समाधान धर्मराज गायकवाड, प्रिन्सकुमार मुन्ना सिंग, राहुल कल्याण गोरे, विकी विजय कांबळे, संग्राम उर्फ चंदन सिंग आणि जॉकी माझी यांचे धागे समोर आले.
🚨 ओडिशापर्यंत पोहोचला तपास!
तपासात विकी कांबळेचा ओडिशातील जॉकी माझी याच्याशी संपर्क असल्याचा धागा समोर आल्याने या प्रकरणाला आंतरराज्यीय स्वरूप असल्याचे स्पष्ट होऊ लागले. गांजाची खरेदी, वाहतूक, साठवणूक आणि पुढील वितरणाची साखळी तपासाच्या केंद्रस्थानी आली.
दरम्यान, विकी कांबळेच्या हालचालींबाबत मिळालेल्या माहितीनंतर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने ही माहिती सांगली पोलिसांना दिली. त्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि कुपवाड MIDC पोलिसांनी कारवाई करत इनोव्हा वाहनातून १३४ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजा, वाहन, मोबाईल व इतर साहित्य असा सुमारे ४२.६३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
⚡ बारामतीत दोन गुन्हे; ५०१ किलोपेक्षा अधिक गांजा!
बारामती शहर पोलीस स्टेशनच्या गु.र.नं. ७८/२०२६ मध्ये ४७८.९५० किलो, तर गु.र.नं. १९०/२०२६ मध्ये २३.०१० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. म्हणजेच या दोन प्रकरणांत तब्बल ५०१.९६० किलो गांजा जप्त झाला आहे.
त्यात सांगली-कुपवाड येथील १३४ किलो गांजा जप्तीची कारवाई विचारात घेतल्यास संबंधित तपासातील गांजाचे प्रमाण ६३५.९६० किलोपर्यंत पोहोचते.
🔎 आता ‘सोर्स टू डेस्टिनेशन’चा शोध
विकी कांबळेला २ सप्टेंबर रोजी रात्री अटक केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून गांजाचा मूळ स्रोत, ओडिशापासून बारामतीपर्यंतची वाहतूक साखळी, वापरलेली वाहने, मोबाईल-सिमकार्ड, डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, साठवणुकीची ठिकाणे आणि वितरण नेटवर्क याबाबत तपास सुरू केला आहे.
दोन ड्रमपासून सुरू झालेला तपास आता संपूर्ण नेटवर्कच्या मुळापर्यंत पोहोचला असून, या कारवाईमुळे बारामतीतील गांजा तस्करीच्या मोठ्या साखळीवर पोलिसांनी निर्णायक घाव घातल्याचे चित्र आहे.
ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक कारंडे तसेच बारामती शहर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी-अंमलदारांनी तपासात विशेष परिश्रम घेतले.
दरम्यान, उर्वरित आरोपी, ओडिशातील पुरवठा साखळी आणि आर्थिक व्यवहारांचा तपास अद्याप सुरू आहे.






