सोमेश्वर

सोमेश्वरमध्ये शेतकरीहिताचा ‘मास्टर प्लॅन’! AI, आधुनिक तंत्रज्ञान अन् CNG-इथेनॉलवर सुनेत्रा पवारांचा भर; ‘शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे!’

शेतकरी सक्षम तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत!

सोमेश्वरच्या शेतकरी मेळाव्यात सुनेत्रा पवारांचा विकासाचा रोडमॅप; तंत्रज्ञान, नियोजन अन् मूल्यवर्धित उत्पादनांवर भर

शेतकरी सक्षम तर ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत!

सोमेश्वर; प्रतिनिधि

बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाच्या बाजारपेठेतील अनिश्चितता या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादन खर्चात बचत आणि शेतीचे अर्थकारण मजबूत करणे आवश्यक आहे. कृषी व साखर क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धित उत्पादन आणि अचूक नियोजनाचा स्वीकार करून शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, सोमेश्वरनगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, आमदार सचिन पाटील, माजी आमदार संभाजी कुंजिर, पीडीसीसी बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष किसन तांबे, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

AI, यांत्रिकीकरणातून उत्पादन खर्चात बचत

शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असल्याचे सांगताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, शेतकरी सक्षम झाला तर गावाची आणि राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. शासन, शेतकरी, सहकारी संस्था आणि साखर उद्योगाने समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

स्वर्गीय दादा हे स्वतः शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणींची जवळून जाण होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), आधुनिक सिंचन, यांत्रिकीकरण, माती परीक्षण, सुधारित वाणांची निवड आणि अचूक पीक नियोजन यांचा वापर वाढविल्यास उत्पादनक्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

‘केवळ साखरेवर अवलंबून राहू नका’

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा साखर उद्योग हा महत्त्वाचा कणा आहे. मात्र अतिवृष्टी, दुष्काळ, हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि साखरेच्या बाजारपेठेतील चढ-उतारांचा सामना करण्यासाठी साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल, बायोगॅस, CNG, सेंद्रिय खत आणि अन्य मूल्यवर्धित उत्पादनांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन सुनेत्रा पवार यांनी केले.

सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षमतेचे कौतुक

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आर्थिक शिस्त, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरीहिताला प्राधान्य देत सहकार क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे. सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी आणि व्यवस्थापनाच्या योगदानामुळे कारखान्याने प्रगती साधली आहे. आगामी काळातही सभासद शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची परंपरा कायम ठेवत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सहकारी संस्थांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीचे कौतुक केले. तर आमदार सचिन पाटील यांनी कारखान्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे, आर्थिक शिस्तीचे आणि शेतकरीहिताच्या कामकाजाचे कौतुक केले.

कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रास्ताविकात कारखान्याच्या विविध उपक्रमांची व कामगिरीची माहिती दिली. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button