सोमेश्वर

चार हजारांचा दर अन् निवडणुकीची चाहूल; सोमेश्वरच्या राजकारणात रोहित पवारांची नवी खेळी?

सोमेश्वर कारखान्याने साखर उद्योगात स्वतंत्र ठसा उमटवल्याचे नमूद

चार हजारांचा दर अन् निवडणुकीची चाहूल; सोमेश्वरच्या राजकारणात रोहित पवारांची नवी खेळी?

सोमेश्वर कारखान्याने साखर उद्योगात स्वतंत्र ठसा उमटवल्याचे नमूद

बारामती वार्तापत्र 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची आगामी निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने सक्षम उमेदवार देऊन बिनविरोध करावी, अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडली आहे.

सहकार क्षेत्रातील निवडणुकीत राजकारण बाजूला ठेवून शेतकरी सभासदांचे हित केंद्रस्थानी ठेवणे योग्य ठरेल, असे त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटले आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच होणार असल्याने रोहित पवार यांच्या या भूमिकेला राजकीयदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले आहे. कारखान्याची आर्थिक शिस्त, व्यवस्थापन आणि कामगिरीचा उल्लेख करत त्यांनी अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्याने साखर उद्योगात स्वतंत्र ठसा उमटवल्याचे नमूद केले.

अजित पवार यांच्या निधनाला अद्याप वर्ष पूर्ण झालेले नसताना त्यांच्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा विचार करून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यक्षम उमेदवार देत निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करावा, अशी आपली वैयक्तिक इच्छा असल्याचे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीने कारखाना चालला, त्याच पद्धतीने पुढेही शेतकऱ्यांचे हित केंद्रस्थानी ठेवून कारभार व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यंदा प्रतिटन चार हजारांचा दर
सोमेश्वर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामासाठी प्रथमच प्रतिटन चार हजार रुपयांचा दर जाहीर केला असून, हा राज्यातील सर्वाधिक दर असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कारखान्याची कामगिरी आणि शेतकरी सभासदांना मिळणारा दर हे मुद्देही चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

युगेंद्र पवारांच्या मेळाव्यामुळे राजकीय हालचालींना वेग
दरम्यान, मागील महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता मेळावा घेतला होता. त्यामुळे शरद पवार गटाकडून निवडणुकीची पूर्वतयारी सुरू असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणुकीबाबत अद्याप अधिकृत भूमिका समोर आलेली नाही. उमेदवारी आणि निवडणूक रणनीतीबाबत पडद्यामागे हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

‘हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली’
सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करून शेतकरी सभासदांचे हित जपणे, राजकारणापेक्षा सहकाराला प्राधान्य देणे आणि कारखान्याचा कारभार सक्षमपणे पुढे नेणे हीच अजित पवारांना खरी श्रद्धांजली ठरेल, असेही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मात्र, सोमेश्वर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका ही रोहित पवारांची वैयक्तिक भूमिका असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे त्यांच्या आवाहनाला दोन्ही राष्ट्रवादींकडून काय प्रतिसाद मिळतो, याकडे सोमेश्वर कार्यक्षेत्रातील शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे.

Back to top button