बारामतीला ३० खाटांचा ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा; दादांची स्वप्नपूर्ती करणार.
राज्यातील ७५ स्मार्ट व्हिलेजपैकी तब्बल १० गावे बारामती तालुक्यातील निवड

बारामतीला ३० खाटांचा ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची घोषणा; दादांची स्वप्नपूर्ती करणार.
राज्यातील ७५ स्मार्ट व्हिलेजपैकी तब्बल १० गावे बारामती तालुक्यातील निवड
बारामती वार्तापत्र
अनेक वर्षे आपण दादांचा वाढदिवस साजरा केला, पण यंदा त्यांची जयंती साजरी करावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते, या शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक झाल्या. समाधान शिबिरातील भाषणात त्यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा देत बारामतीच्या विकासाला आणखी गती देण्याची मोठी घोषणा केली.
भाषणाच्या सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांनी दादांना अभिवादन केले. “बारामती ही दादांची कर्मभूमी होती. तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच त्यांचे स्वप्न होते. आता ते स्वप्न पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल,” असे त्या ठामपणे म्हणाल्या.
यावेळी त्यांनी बारामतीकरांसाठी महत्त्वाच्या विकासकामांची घोषणा करत राष्ट्रीय अभियानांतर्गत ३० खाटांचा अत्याधुनिक क्रिटिकल केअर ब्लॉक मंजूर झाल्याची माहिती दिली.
तसेच राज्यातील ७५ स्मार्ट व्हिलेजपैकी तब्बल १० गावे बारामती तालुक्यातील निवडण्यात आल्याची आनंदाची बातमीही त्यांनी जाहीर केली. शेतकरी हिताच्या कामांचा आढावा घेताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, दादांच्या प्रयत्नातून ₹८८.८८ कोटींच्या पाणंद रस्त्यांची कामे सुरू असून त्यामुळे शेतरस्ते मजबूत होऊन शेतीतील वाद कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे जिल्ह्यातील ६१ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाल्याचाही त्यांनी उल्लेख केला.
राज्यभर सुरू असलेल्या समाधान शिबिरांचा उद्देश प्रशासन अधिक गतिमान करून नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “प्रशासन घराघरात पोहोचले पाहिजे, जनतेचा वेळ आणि पैसा वाचला पाहिजे,” असे त्या म्हणाल्या.
बारामतीतील कचरा प्रक्रिया केंद्राच्या प्रश्नावरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. सोमेश्वर साखर कारखान्याने जागा उपलब्ध करून दिल्यास वित्त आयोग किंवा स्वनिधीतून हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
समाधान शिबिराला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची दखल घेत हे शिबिर उद्याही सुरू ठेवण्याचे निर्देश प्रांताधिकाऱ्यांना देत असल्याची घोषणा सुनेत्रा पवार यांनी केली. त्यांच्या घोषणांमुळे बारामतीच्या आरोग्य, ग्रामविकास आणि प्रशासनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.







