सोमेश्वर

अजितदादांनंतरची पहिलीच निवडणूक; सोमेश्वरमध्ये राजकीय शक्तिप्रदर्शन;२७ हजार सभासद, ६०१ उमेदवार

राष्ट्रवादीचा गड टिकणार की समीकरणे बदलणार?

अजितदादांनंतरची पहिलीच निवडणूक; सोमेश्वरमध्ये राजकीय शक्तिप्रदर्शन;२७ हजार सभासद, ६०१ उमेदवार

राष्ट्रवादीचा गड टिकणार की समीकरणे बदलणार?

बारामती वार्तापत्र 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणांगण चांगलेच तापले असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ६०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे कारखान्याच्या निवडणुकीत यंदा मोठी राजकीय चुरस निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

स्वर्गीय अजित पवार यांच्या निधनानंतर होणारी सोमेश्वर कारखान्याची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. महायुती तसेच महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल केल्याने संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बारामती येथील प्रशासकीय भवन परिसरात सकाळपासूनच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक उमेदवारांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले. काही उमेदवारांनी अजितदादांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करून उमेदवारी अर्ज दाखल केला.

चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र आणि सुमारे २७ हजार सभासद असलेल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता राहिली आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या विविध राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केल्याने निवडणूक बहुरंगी होण्याची शक्यता आहे.

दिग्गज मैदानात; निवडणुकीची रंगत वाढली

या निवडणुकीत अनेक आजी-माजी पदाधिकारी आणि स्थानिक राजकीय नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रमुख अर्जदारांमध्ये विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप, शेतकरी नेते सतीशराव काकडे, माजी चेअरमन राजवर्धन शिंदे, माजी जिल्हा परिषद सभापती प्रमोद काकडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे अध्यक्ष राजेंद्र जगताप, नवनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष संग्राम सोरटे, माजी उपाध्यक्ष मिलिंद कांबळे आणि किसन तांबे यांचा समावेश आहे.

याशिवाय विविध आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच आणि सोसायटी चेअरमन यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे.

निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

अजितदादांच्या निधनानंतरची ही पहिली सोमेश्वर कारखाना निवडणूक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेससमोरील पारंपरिक सत्ता टिकविण्याचे आव्हान आणि विरोधकांसमोरील सत्तांतराची संधी यामुळे निवडणुकीला विशेष रंग चढला आहे.

आता उमेदवारी अर्जांची छाननी आणि माघारीनंतर प्रत्यक्ष मैदानात किती उमेदवार राहतात, यावर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, सुरुवातीलाच ६०१ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने सोमेश्वरच्या सत्तासंघर्षाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Back to top button