स्थानिक

श्रमदानातून अजितदादांना अभिवादन! बारामती RTO मध्ये युवकांचा स्वच्छतेचा जागर

१५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

श्रमदानातून अजितदादांना अभिवादन! बारामती RTO मध्ये युवकांचा स्वच्छतेचा जागर

१५० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बारामती वार्तापत्र 

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ ‘स्वर्गीय अजितदादा पवार स्वच्छता मित्र मंडळा’च्या पुढाकारातून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे व्यापक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जय हो करिअर अकॅडमी आणि जय हिंद अकॅडमी यांच्या सहभागातून झालेल्या या उपक्रमात सुमारे १५० विद्यार्थ्यांसह RTO कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि विविध घटकांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान केले.

या अभियानात सहभागी झालेल्या सर्वांनी कार्यालय परिसर तसेच आसपासच्या भागाची स्वच्छता केली. ‘आपले कार्यालय – आपली जबाबदारी’ हा संदेश देत सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

अजितदादांच्या कार्यसंस्कृतीला स्वच्छतेतून अभिवादन

स्वर्गीय अजितदादा पवार यांचा शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि दर्जेदार विकासकामांवर विशेष भर होता. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहणारे आहे. त्यांच्या कार्यसंस्कृतीचा आदर्श समोर ठेवून राबविण्यात आलेले हे अभियान त्यांच्या स्मृतीस श्रमदानातून विनम्र अभिवादन ठरले.

विशेषतः मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करत स्वच्छता, सामाजिक जबाबदारी आणि सार्वजनिक मालमत्तेबद्दलची आपुलकी यांचा प्रभावी संदेश दिला. युवकांचा सामाजिक उपक्रमातील हा सहभाग सकारात्मक आणि प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

स्वच्छता एक दिवसाची नव्हे, तर संस्कृतीची!

स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मोहीम न राहता दैनंदिन सवय आणि संस्कृती बनली पाहिजे, असे आवाहन करण्यात आले. सार्वजनिक कार्यालये आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडावी, असा संदेशही या अभियानातून देण्यात आला.

या उपक्रमासाठी पुढाकार घेतलेल्या स्वर्गीय अजितदादा पवार स्वच्छता मित्र मंडळ, जय हो करिअर अकॅडमी, जय हिंद अकॅडमीचे विद्यार्थी तसेच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांचे कार्यालयाच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

“स्वच्छ कार्यालय – सुंदर कार्यालय – आपला अभिमान!”

Back to top button