इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई! गावठी पिस्टलसह बिहारचा तरुण अटकेत; दोन जिवंत काडतुसे, दोन मॅगझीन जप्त
कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू

इंदापूर पोलिसांची मोठी कारवाई! गावठी पिस्टलसह बिहारचा तरुण अटकेत; दोन जिवंत काडतुसे, दोन मॅगझीन जप्त
कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू
इंदापूर | प्रतिनिधी
इंदापूर पोलिसांनी अवैध शस्त्रांविरोधात प्रभावी कारवाई करत बिहारच्या एका तरुणाला गावठी पिस्टलसह अटक केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपीकडून एक गावठी पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, दोन मॅगझीन आणि इतर साहित्य असा सुमारे ₹५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेला आरोपी हा बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्याचा मूळ रहिवासी असून, इंदापूर परिसरात पंक्चर दुरुस्तीचे दुकान चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केली. आरोपीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याकडे शस्त्र कुठून आले, त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता आणि त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश केकाण करत असून, अवैध शस्त्रांविरोधातील पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.







