बारामतीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होणार; जानाई-शिरसाई योजनेतून सर्व तलाव भरण्याच्या सूचना

बारामतीत छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख होणार; जानाई-शिरसाई योजनेतून सर्व तलाव भरण्याच्या सूचना
बारामती वार्तापत्र
बारामती विधानसभा मतदारसंघातील सोमेश्वर येथील श्री शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी येथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे उद्घाटन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महसूल प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान, लोकाभिमुख आणि नागरिक-केंद्रित करण्यासाठी अशा शिबिरांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, पंचायत समिती सभापती किरण तावरे, नगराध्यक्ष सचिन सातव, पीडीसीसी बँकेचे संचालक संभाजी होळकर, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल विभागाशी संबंधित तक्रारींचे त्वरित निवारण करून विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश या शिबिरामागे आहे. अशा उपक्रमांमुळे प्रशासन थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचत असून हीच खरी लोकाभिमुख शासनव्यवस्था असल्याचे त्यांनी नमूद केले.
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे शंभर टक्के भरली असून जानाई-शिरसाई योजनेतून तालुक्यातील सर्व जलसाठे आणि तलाव तातडीने भरण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
महसूल विभागाने गेल्या दीड वर्षात सातबारा, फेरफार, वारस नोंद, अकृषिक परवानगी यांसारख्या सेवांमध्ये पारदर्शकता आणि गती आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगत, नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचविण्यावर शासनाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बारामती तालुक्यात शेतीसाठी पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे अधिक मजबूत करण्यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगताना, संमतीने शेतरस्ते तयार करण्याच्या उपक्रमाला गती देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
यावेळी बारामतीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ३० खाटांचा ‘क्रिटिकल केअर ब्लॉक’ मंजूर झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच महाराष्ट्रातील स्मार्ट व्हिलेज व इंटेलिजंट व्हिलेज योजनेत निवड झालेल्या ७५ गावांपैकी तब्बल १० गावे बारामती तालुक्यातील असल्याचेही त्यांनी सांगितले.
घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित संस्थांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी शिबिरात महसूल, ग्रामविकास, कृषी, आरोग्य आदी विभागांचे ३० स्टॉल उभारण्यात आले असून सुमारे २० हजार नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्याचे नियोजन असल्याची माहिती दिली.
कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनांची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली तसेच महसूल आणि कृषी विभागाच्या सुधारणा व सेवांवरील माहिती पुस्तिकेचे अनावरणही करण्यात आले.







