बारामतीत ‘खेळाडूंसाठी शिक्षण’चा आदर्श! १२ राष्ट्रीय खेळाडूंना शारदानगरमध्ये मोफत प्रवेश
मेहनतीला मिळाले बळ!

बारामतीत ‘खेळाडूंसाठी शिक्षण’चा आदर्श! १२ राष्ट्रीय खेळाडूंना शारदानगरमध्ये मोफत प्रवेश
मेहनतीला मिळाले बळ!
बारामती वार्तापत्र
ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार महिला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शारदानगर येथे क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत खेळाडूंचा गौरव करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मध्ये क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ क्रीडा शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला.
मल्लखांब क्रीडा प्रकारात महाविद्यालयाची खेळाडू श्रुती संतोष गुळवे हिने अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेत रौप्यपदक तसेच विद्यापीठाच्या खेलो इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तर प्रतीक्षा आप्पासो पाटील हिने महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवातील व्हॉलीबॉल स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेच्या विश्वस्त-सचिव सौ. सुनीदा पवार यांच्या हस्ते शारदा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या मल्टीपर्पज हॉलमध्ये सत्कार करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या राष्ट्रीय स्तरावरील १२ खेळाडूंना मोफत प्रवेश देण्यात आला. तसेच शिष्यवृत्तीच्या धनादेशांचे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी सौ. सुनीदा पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेतील अत्याधुनिक क्रीडांगणे, जिम, जलतरण तलाव, सिंथेटिक ट्रॅक आणि इनडोअर हॉल यांसारख्या सुविधांचा पुरेपूर वापर करण्याचे आवाहन केले. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि शिस्तीच्या जोरावर क्रीडा क्षेत्रात आपले नाव उज्ज्वल करावे, तसेच क्रीडा क्षेत्रातील विविध शासकीय नोकरीच्या संधी व योजनांचा लाभ घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. रा. बा. देशमुख, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. आर. एस. देवकर, क्रीडा समिती सदस्य डॉ. जयवंत राठोड तसेच क्रीडा विभागातील सर्व खेळाडू उपस्थित होते.






