माळेगाव बु

बारामती बसस्थानकाची ‘शिस्त’ कुठे हरवली? पार्किंगच्या दुरावस्थेने नागरिकांचा संताप!

सोशल मीडियावर चर्चेत; पार्किंग आणि अनधिकृत वाहनांवर नियंत्रण कोणाचे?

बारामती बसस्थानकाची ‘शिस्त’ कुठे हरवली? पार्किंगच्या दुरावस्थेने नागरिकांचा संताप!

सोशल मीडियावर चर्चेत; पार्किंग आणि अनधिकृत वाहनांवर नियंत्रण कोणाचे?

अनधिकृत होल्डिंग, जाहिरात फलक आणि बॅनरमुळे बसस्थानकाचे विद्रूपीकरण होत असल्याची चर्चा

बारामती वार्तापत्र 

महाराष्ट्रासह देशभरात ज्या बारामती बसस्थानकाच्या नियोजनाचे आणि सुविधांचे कौतुक केले जाते, त्याच बसस्थानकातील पार्किंग व्यवस्थेच्या दुरावस्थेमुळे नागरिक आणि प्रवाशांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. पार्किंगमध्ये निर्माण होणारी अडचण, वाहनांची बेशिस्त वर्दळ आणि प्रवाशांना होणारा त्रास याकडे संबंधित प्रशासनाचे पुरेसे लक्ष आहे का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

बसस्थानक परिसरातील व्यवस्थेबाबत नागरिकांकडून वारंवार प्रश्न उपस्थित होत असतानाही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा दिसत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. ‘नागरिक त्रस्त आणि अधिकारी मस्त’ अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.

विशेष म्हणजे बारामती–पुणे नॉनस्टॉप बससेवेच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकातील प्रवासी व्यवस्थेचाही मुद्दा ऐरणीवर आला आहे. बसस्थानक परिसरात इतर वाहनचालकांकडून प्रवाशांना आकर्षित करून आपल्या वाहनातून घेऊन जाण्याचे प्रकार होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. हे प्रकार नियमबाह्य असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एसटीच्या अधिकृत बससेवेला प्रवासी मिळणे आणि बसस्थानकाची शिस्त कायम राहणे, यासाठी प्रशासनाने अशा प्रकारांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. बसस्थानक परिसरात बेशिस्त वाहनांना आळा घालणार कोण? पार्किंग व्यवस्था सुधारणार कोण? आणि प्रवाशांना सुरक्षित व सुरळीत सेवा देणार कोण? हे प्रश्न आता नागरिकांकडून थेट विचारले जात आहेत.

एकेकाळी शिस्तबद्ध नियोजन आणि विकासाचे उदाहरण म्हणून चर्चेत असलेल्या बारामती बसस्थानकाची पार्किंग व्यवस्थेमुळे होणारी संभाव्य बदनामी थांबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

चौकट

बसस्थानक परिसरात लावण्यात आलेल्या अनधिकृत होल्डिंग, जाहिरात फलक आणि बॅनरमुळे बसस्थानकाचे विद्रूपीकरण होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. महाराष्ट्रात आदर्श आणि नियोजनबद्ध बसस्थानक म्हणून कौतुक झालेल्या बारामती बसस्थानकाच्या परिसरात अशा प्रकारे होल्डिंगची गर्दी वाढत असेल, तर त्याची जबाबदारी नेमकी कोणाची? परवानगी नसलेले फलक असतील तर त्यावर कारवाई कधी होणार? आणि बसस्थानकाचा नावलौकिक टिकवण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलणार तरी कधी?

पार्किंगची दुरवस्था, बेशिस्त वाहनांची वर्दळ, प्रवाशांना आकर्षित करणाऱ्या वाहनांचा प्रश्न आणि आता होल्डिंगच्या माध्यमातून होणारे संभाव्य विद्रूपीकरण—या सर्व गंभीर बाबींकडे डेपो प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष कधी जाणार? असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

‘बारामती बसस्थानकाचा नावलौकिक फक्त नावापुरता राहणार की प्रत्यक्ष व्यवस्थेतही दिसणार?’ हा प्रश्न आता प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

Back to top button