स्थानिक

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस

बारामती दूध संघाची ४९ वी वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात

दूध उत्पादकांना ७५ पैसे दरफरक; सभासदांना १३ टक्के लाभांश, कर्मचाऱ्यांना २५ टक्के बोनस

बारामती वार्तापत्र 

बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, बारामतीची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी कसबा, बारामती येथील ‘शरद सभागृह’ येथे खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेत संघाच्या मागील वर्षातील कामकाजाचा आढावा घेण्यात आला. दूध संकलन, दूध उत्पादकांना देण्यात आलेला दरफरक, सभासदांना लाभांश, पशुखाद्य विक्रीवरील दरफरक तसेच आगामी काळात हाती घेण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती सभासदांसमोर मांडण्यात आली.

संघाचे कामकाज उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार आणि खासदार पार्थदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, संघाने मागील काळात भरीव प्रगती केली असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

दररोज १ लाख २८ हजार लिटर दूध संकलन

सन २०२५-२६ या अहवाल वर्षात बारामती दूध संघामार्फत सरासरी दररोज १ लाख २८ हजार लिटर दूध संकलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत संघाच्या माध्यमातून विविध आर्थिक लाभ देण्यात आल्याची माहिती सभेत देण्यात आली.

यामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर ४० पैसे, तर प्राथमिक दूध संस्थांना प्रति लिटर ३५ पैसे, असा एकूण ७५ पैसे प्रति लिटर दूध दरफरक देण्यात आला आहे. याशिवाय संघाच्या सभासदांना १३ टक्के लाभांश देण्यात आल्याचेही सभेत जाहीर करण्यात आले.

पशुखाद्य विक्रीवरही ५० रुपये प्रति पोते दरफरक

दूध उत्पादकांना पशुखाद्याच्या माध्यमातूनही आर्थिक लाभ देण्यात आला आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०२५ या सहा महिन्यांच्या कालावधीत पशुखाद्य विक्रीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति पोते २५ रुपये, तर प्राथमिक दूध संस्थांना प्रति पोते २५ रुपये, असा एकूण ५० रुपये प्रति पोते दरफरक देण्यात आल्याची माहिती संघाच्या वतीने देण्यात आली.

संघाच्या कायम कर्मचाऱ्यांनाही आर्थिक प्रोत्साहन देण्यात आले असून, त्यांना २५ टक्के बोनस तसेच अडीच पगारांचे इन्सेंटिव्ह देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

माळेगावात ५ कोटींचा स्वयंचलित दुग्धपदार्थ निर्मिती प्रकल्प

आगामी आर्थिक वर्षात संघाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा आणि उत्पादनवाढीच्या दृष्टीने विविध प्रकल्प हाती घेण्यात येणार आहेत.

सन २०२६-२७ मध्ये नंदन डेअरी, माळेगाव येथे सुमारे ५ कोटी रुपये खर्चाचा ऑटोमेटिक दुग्धपदार्थ निर्मिती प्लांट उभारण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर १२ मेट्रिक टन क्षमतेचा पावडर प्लांट उभारण्याचीही योजना असल्याचे सभेत सांगण्यात आले.

याशिवाय नंदन डेअरी व पशुखाद्य प्लांट, माळेगाव येथे सोलर सिस्टीम, नंदन डेअरी येथे मिनरल वॉटर प्लांट, दूध संघाची वसाहत तसेच भिगवण रोड, बारामती येथे कमर्शियल बिल्डिंग उभारण्याची कामे प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांमुळे संघाच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्याबरोबरच भविष्यातील आर्थिक वाटचालीला चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

संघाच्या प्रगतीचा आढावा

वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाच्या आर्थिक व प्रशासकीय कामकाजाचा आढावा घेण्यात आला. दूध संकलन वाढविणे, दूध उत्पादकांना योग्य दर मिळवून देणे, पशुखाद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ देणे तसेच दूध प्रक्रिया व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्मितीमध्ये विस्तार करण्यावर भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

संघाचे चेअरमन किशोर भगवानराव फडतरे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेतील प्रास्ताविकात संघाच्या कामकाजाची आणि आगामी विकासकामांची माहिती दिली.

मान्यवरांची उपस्थिती

या वार्षिक सभेस तालुका अध्यक्ष संदीपतात्या बांदल, पीडीसीसी बँकेचे संचालक संभाजीनाना होळकर, बारामतीचे नगराध्यक्ष सचिनशेठ सातव, पंचायत समितीचे सभापती किरण तावरे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास नाना देवकाते पाटील, पीडीसीसी बँकेचे संचालक रणजित तावरे व दत्तात्रय येळेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष रावसाहेबदादा शिंदे, जिल्हा परिषद सदस्य करण खलाटे, संघाचे माजी चेअरमन सतीशदादा तावरे, रियल डेअरीचे चेअरमन मनोज तुपे यांच्यासह संघाचे सभासद, आजी-माजी पदाधिकारी, संचालक मंडळ आणि अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संघाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे, उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

सभेच्या शेवटी उपस्थित सभासद व मान्यवरांचे आभार संघाचे व्हाईस चेअरमन पुरुषोत्तम गाडे यांनी मानले.

Back to top button