राजकीय

1. सोमेश्वरच्या निवडणुकीत ‘२० लाखांचा बॉम्ब’ फुटलाच नाही?; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्राने आरोपांनाच नवे वळण!

२० लाखांचा दावा, समोर आली २ लाख ३ हजार २० रुपयांची नोंद!

सोमेश्वरच्या निवडणुकीत ‘२० लाखांचा बॉम्ब’ फुटलाच नाही?; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्राने आरोपांनाच नवे वळण!

२० लाखांचा दावा, समोर आली २ लाख ३ हजार २० रुपयांची नोंद!

बारामती वार्तापत्र 

श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सांगता सभेनंतर कथित पैसेवाटपाच्या आरोपांनी राजकीय वातावरण तापले असतानाच, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्रामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. माळेगाव नगराध्यक्षांच्या वाहनात २० लाख रुपये असल्याचा आरोप संजय जगताप यांनी केला होता. मात्र, संबंधित वाहनातून प्रत्यक्ष पैसे जप्त करण्यात आले नसल्याचे अधिकृत पत्रात नमूद करण्यात आल्याने या आरोपांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

२० लाखांचा आरोप; प्रत्यक्ष नोंद वेगळ्याच रकमेची!

९ ऑक्टोबरच्या रात्री माळेगाव परिसरात कथित पैसेवाटपाच्या मुद्द्यावरून दोन गटांत वाद झाल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळाली. या घटनेनंतर आचारसंहिता कक्षाचे अधिकारी आर. जाधव यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा केला. यावेळी घटनास्थळी असलेल्या दोन वाहनांची तपासणी करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्रात नमूद आहे.

या प्रक्रियेदरम्यान हर्बल सतीश जगताप, रोहित पुरुषोत्तम जगताप आणि अविष्कार सतीश सकुंडे यांनी दोन लाख तीन हजार २० रुपये तसेच काही व्यक्तींच्या नावांची हस्तलिखित यादी आचारसंहिता कक्षाच्या अधिकाऱ्यांकडे स्वतःहून जमा केली. मात्र, तक्रारदारांनी एमएच-४२ एएक्स ९२९७ क्रमांकाच्या वाहनात रक्कम आढळल्याचा दावा केला असला, तरी संबंधित वाहनातून प्रत्यक्ष रक्कम जप्त करण्यात आली नसल्याचे अधिकृत पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण!

या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने २० लाखांच्या आरोपांचे खंडन करत विरोधकांवरच पैसे ठेवल्याचा प्रतिआरोप केला आहे. त्यामुळे सोमेश्वरच्या निवडणुकीतील राजकीय संघर्षाला आणखी धार आली आहे. मात्र, नेमकी रक्कम कोणाकडे होती, तिचा उद्देश काय होता आणि कथित पैसेवाटप झाले का, याबाबत अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही.

आता तपासातून काय बाहेर येणार?

पोलिस यंत्रणा आणि आचारसंहिता कक्षाच्या समन्वयातून या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. दोन्ही बाजूंचे म्हणणे आणि उपलब्ध पुरावे तपासल्यानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल. मतदारांना आर्थिक प्रलोभन दिल्याचे किंवा निवडणूक आचारसंहितेचा भंग झाल्याचे निष्पन्न झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या पत्रात नमूद आहे.

एकीकडे २० लाखांच्या आरोपांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले, तर दुसरीकडे अधिकृत पत्रात प्रत्यक्ष वाहनातून जप्ती झालेली नसल्याची नोंद पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपांच्या पलीकडे जाऊन पुरावे काय सांगतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोमेश्वरच्या निवडणुकीतील या पैशांच्या प्रकरणाचा अंतिम निकाल आता चौकशीच्या निष्कर्षांवर अवलंबून राहणार आहे.

 

Back to top button